दर्यापुरात भाजपाला पुन्हा खिंडार

    दिनांक :07-Apr-2021
|
- आ. भारासाकळे यांचे निकटवर्तीय काँगेसमध्ये
 
दर्यापूर, 
दर्यापूर येथील भाजपाचे नेते तथा अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे विनोद पवार, सुधीर पवार व पिंटू पवार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. 
 
darya_1  H x W:
 
काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलु देशमुख, दर्यापूर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. दर्यापूर नगर पालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असताना भाजपतील मंडळी काँग्रेसवासी होत असल्याने पक्षीय राजकारण मोठ्या प्रमाणात बदलणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहे.
 
 
विनोद पवार आणि सुधीर पवार हे बंधू भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वानखेडे यांच्या सोबत भाजपामध्ये आले होते. पक्षकार्य व राजकारणातील हातोटी यामुळे ते आ. भारासाकळे यांचे अतिशय निकटवर्तीय झाले होते. दर्यापुरातील अनेक निर्णय पवार बंधूंच्या सल्लाने होत होते. राजकारणातील डावपेच व सामाजिक कार्य यामुळे सदर बंधू शहरात सुपरिचित आहेत. मागील पालिका निवडणुकीत भाजपाच्या नलिनी भरासाकळे यांना नगराध्यक्षपदी निवडून आणण्यात या बंधूंचा मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. पक्ष बदलामुळे आता दर्यापूर काँग्रेसची सरशी होणार असे चित्र दिसत आहे. मागील महिन्यात असेच प्रवशे काँग्रेसमध्ये झाले होते. पालिका निवडणुकीपूर्वी पक्षीय पडझड होत असली तरी आणखी काही लोक भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती मिळाली आहे.