पुण्यात कोरोनाची स्थिती आवाक्याबाहेर

    दिनांक :07-Apr-2021
|
- महापालिकेने मागितली लष्कराकडे मदत
पुणे, 
पुण्यातील कोरोना संसर्गाची स्थिती आवाक्याबाहेर जात आहे. बाधितांना रुग्णालयांत खाटा मिळणेही कठीण झाले आहे. येथे आयसीयू आणि व्हेंटिलेटर्सचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने पुणे महानगरपालिकेने लष्कराकडे मदत मागितली आहे.  पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जवळपास 21 हजारांहून अधिक खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, यातील बहुतांशी खाटांना व्हेंटिलेटरची सुविधा नाही. केवळ 489 बेड्सला व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. सोमवारी सायंकाळी येथे एकही व्हेंटिलेटर असलेली खाट नसल्याचे समोर आले होते. मंगळवारी रात्री उशिरानंतर काही खाटा उपलब्ध झाल्या. मात्र, बाधितांची मोठ्या प्रमाणात परवड होत आहे.
 
pune_1  H x W:
 
कोरोना संसर्ग आवाक्याबाहेर जात असल्याचे पाहून पुणे महापालिकेने लष्कराकडे मदत मागितली आहे. पुण्यात भारतीय लष्कराचे मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात 335 खाटा आणि 15 व्हेंटिलेटर्सची अद्ययावत सुविधा आहे. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने लष्कराकडे मदत मागितली आहे. लष्करी रुग्णालयाकडून मदत मिळण्याची आशा पुणे महापालिकेने व्यक्त केली आहे. परंतु, या मागणीबाबत अद्याप लष्करी रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.