कारमध्ये एकटे असतानाही मुखाच्छादन आवश्यक

    दिनांक :07-Apr-2021
|
- दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल
नवी दिल्ली, 
कारमध्ये एकटे असतानाही मुखाच्छादन घालणे अनिवार्य आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात मुखाच्छादन हे सर्वोत्तम सुरक्षा कवच आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने आज बुधवारी दिला. कारमधून एकच व्यक्ती प्रवास करीत असेल आणि त्याने मुखाच्छादन घातले नसेल, तर त्याच्यावर दंड आकारण्याचा आदेश दिल्लीतील केजरीवाल सरकारने दिला आहे. या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार देताना न्या. प्रतिभासिंह यांच्या एकलपीठाने या प्रकरणी दाखल चार याचिका फेटाळून लावल्या.

nat_1  H x W: 0 
 
कारमधून प्रवास करणारी व्यक्ती एकटीच असली, तरी कार सार्वजनिक ठिकाणावरून फिरत असते. माझे लसीकरण झालेले असल्याने, मला मुखाच्छादन आवश्यक नाही, हा युक्तिवाद देखील मान्य होण्यासारखा नाही. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याने मुखाच्छादन हवेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, या सर्व याचिका वकिलांनी दाखल केल्या होत्या. तुम्ही वकील आहात. सरकारच्या कोरोना प्रतिबंधक प्रत्येक उपायाची माहिती जनतेला देणे, जनजागृती करणे हे तुमचे कर्तव्य आहे. सरकारला सहकार्य न करता तुम्ही त्यांच्याविरोधात याचिका दाखल करीत आहात. कोरोना वाढत असताना, प्रतिबंधात्मक उपायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहात, अशा शब्दांत न्यायालयाने त्यांना झापले.