दिल्ली प्रथमच आयपीएल जिंकण्यास उत्सुक

    दिनांक :07-Apr-2021
|
- सर्वांच्या नजरा ऋषभ पंतवर
नवी दिल्ली,
संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या गत इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सला उपविजेतेदावर समाधान मानावे लागले होते, परंतु यंदाच्या मोसमात संघनेतृत्वाची जबाबदारी नव्या आशा-आकांक्षेसह संपूर्णपणे ऋषभ पंतच्या खांद्यावर आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा पंतच्या कामगिरीवर खिळलेल्या आहेत.
 
spo_1  H x W: 0
 
या मोसमातसुद्धा दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजीची बाजू आणि वेगवान गोलंदाजीची बाजू भक्कम आहे. गत महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान खांद्याला दुखापत झाल्यामुळे श्रेयस अय्यरला आयपीएलच्या बाहेर व्हावे लागले. त्यामुळे ऋषभ पंतकडे एका आठवड्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची सूत्रे सोपविण्यात आली. दिल्ली कॅपिटल्स उत्तरोत्तर ताकदीने वाढत आहे. 2019 साली तसेच 2021 मध्ये दिल्लीने उपविजेतेपद मिळविले. मात्र यंदा विजेतेपदाचे ध्येय उराशी ठेवूनच पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स मैदानावर उतरणार आहे. आगामी 10 एप्रिल रोजी मुंबईत चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्याने दिल्ली कॅपिटल्स आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे. तसा दिल्ली कॅपिटल्स हा या स्पर्धेतील एक अत्यंत संतुलित संघांपैकी एक आहे. त्यांची फलंदाजीची आणि वेगवान गोलंदाजीची बाजू एकदम मजबूत आहे. शिखर धवन, पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणेसारखे अव्वल दर्जाचे फलंदाज पहिल्या फळीत आहे. पंतशिवाय मार्कस स्टोइनिस व शिमरॉन हेटमायर किंवा सॅम बिलिंग्जमुळे अय्यरच्या अनुपस्थितीत मधल्या फळीला बळकटी मिळण्याची आशा आहे. याशिवाय स्टीव्ह स्मिथचीसुद्धा फलंदाजीत भर असेल.
 
 
2020 मध्ये सर्वाधिक धावा काढणार्‍या फलंदाजांमध्ये शिखर धवन (618) दुसर्‍या क्रमांकावर होता. त्याने अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेदरम्यान 98 व 76 धावांची देखणी खेळी केली होती. त्यामुळे तो जबरदस्त फॉर्मात असल्याचे दिसत आहे. पृथ्वी शॉनेसुद्धा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आपण जबरदस्त फॉर्मात असल्याचे अलीकडेच विजय हजारे करंडकात आपल्या शैलीदार फलंदाजीतून दाखवून दिले आहे. या स्पर्धेत पृथ्वीने 827 धावा काढल्यात. ऋषभ पंतनेसुद्धा अलीकडेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आपण भारतासाठी विजयी खेळी करणारा खेळाडू म्हणून लौकीक मिळविला आहे. तेव्हा पंतला अष्टपैलू स्टोइनिस व सॅम बिलिंग्जच्या मदतीने दिल्ली कॅपिटल्सला यशाचे शिखर गाठून देऊ शकू, हे सुनिश्चित करावे लागेल. वेगवान गोलंदाजी विभागात दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा व अ‍ॅनरिच नॉर्टिजने 2020 मध्ये 52 बळी टिपून आपण एक स्वप्न जोडी असल्याचे सिद्ध केले आहे. रबाडाने पर्पल कॅपचाही मान मिळविला होता. ख्रिस वोक्स, ईशांत शर्मा व उमेश यादवच्या रूपात दिल्लीकडे वेगवान गोलंदाजीचा भरपूर पर्याय आहे. विदेशी आणि भारतीय क्रिकेटपटू अशा दोन्ही विभागात दिल्ली कॅपिटल्सकडे बदली खेळाडू म्हणून पुरेसे दर्जेदार खेळाडूंचा पर्याय नाही, हाच त्यांचा कमकुवतपणा आहे. त्यामुळे यापूर्वीच्या मोसमात रबाडा व नॉर्टिजला विश्रांती घेता आला नाही. यष्टिरक्षणाच्या बाबतीतही पंतच्या जागी बदली खेळाडू नव्हता, मात्र यावर्षी त्यांच्याकडे केरळचा विष्णू विनोद आहे, पण तो नवखा आहे. ईशांत व उमेश हे दोन वेगवान गोलंदाज राष्ट्रीय संघासाठी आता जास्त मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळत नसल्याने भारतीय वेगवान गोलंदाजी खूप कमकुवत आहे.
 
 
यंदाच्या आयपीएल मोसमात आव्हान मोठे असले तरी युवा कर्णधार ऋषभ पंतला आपल्या मार्गदर्शनाखाली द्ली कॅपिटल्सला पहिल्यांदाच आयपीएल चषक जिंकून देत महेंद्रसिंह धोनीच्या छायेतून बाहेर पडण्याची संधी असेल. तसेच या आयपीएलमुळे पंतला टी-20 विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याच्याकडे भारताच्या फलंदाजी फळीतील महत्त्वाचे खेळाडू आहे. सलामी फलंदाज शिखर धवन डावाची सुरुवात करेल, तर आर. अश्विन व अक्षर पटेललासुद्धा आयसीसी टी-20 विश्वचषकाची पूर्वतयारी करण्याची संधी आहे. पंतने आपल्या छोट्या कारकीर्दीत आतापर्यंत लवचिकपणा व समजूतदारपणा दाखविला आहे, परंतु आता संघनेतृत्वाच्या अतिरिक्त जबाबदारीमुळे एक फलंदाज म्हणून त्याच्या नैसर्गिक आक्रमक खेळीवर परिणाम होणार नाही, हे त्याला सुनिश्चित करावे लागणार आहे. वेगवान गोलंदाज ईशांत व उमेशची टी-20 मध्ये कोणतीही विशेष कामगिरी नसल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची वेगवान गोलंदाजीचा विभाग रबाडा व नॉर्टिजवर अवलंबून आहे.
गत वर्षी दिल्लीने पहिल्या नऊ सामन्यांत सात विजय मिळविल्यानंतर चार वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांना अशा घसरणीपासून सावध राहणे व गत वर्षाप्रमाणे सपशेल कोसळणे टाळावे लागणार आहे.
 
दिल्ली कॅपिटल्स संघ :
 
ऋषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, ख्रिस वोक्स, आर. अश्विन, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ललित यादव, प्रवीण दुबे, कॅगिसो रबाडा, अ‍ॅनरिच नॉर्टिज, ईशांत शर्मा, आवेश खान, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकमन मेरिवाला, एम. सिद्धार्थ, टॉम करन, सॅम बिलिंग्ज.