रोजगारनिर्मिती हे प्रत्येक क्षेत्रासमोरील आव्हान

    दिनांक :07-Apr-2021
|
- नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर, 
रोजगार निर्मितीशिवाय बेरोजगारी दूर होणार नाही आणि कृषी व मागास भागातील गरिबी-उपासमार थांबणार नाही. तर, ग्रामीण कृषी आणि मागास भागातील जीडीपी वाढल्याशिवाय आत्मनिर्भर भारत संकल्पना प्रत्यक्षात येणार नाही. रोजगार निर्मिती हे आज प्रत्येक क्षेत्रासमोरील आव्हान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात एमएसएमईवर एका "कॉफीटेबल बुक" चे विमोचन करताना नितीन गडकरी बोलत होते.
 
gad _1  H x W:
 
याप्रसंगी ते म्हणाले की, सूक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आज एमएसएमईचा जीडीपी ३० टक्के, निर्यात ४८ टक्के असून ५ कोटी रोजगार निर्मिती या विभागाने केली आहे. शहरी भागातील आणि ग्रामीण व मागास भागातील उद्योग असे एमएसएमईचे दोन भाग आम्ही केले आहेत. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागाच्या विकासाकडे आम्हाला प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले.उच्च आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करताना ग्रामीण आणि कृषी क्षेत्राचा विकास करणे आवश्यक झाले असल्याचे सांगताना गडकरी यांनी गाईच्या शेणापासून निर्माण करण्यात येणाऱ्या पेंट उद्योगाचे उदाहरण दिले.
 
तसेच,  ''ऑर्गनिक कार्बन''चे शेतकऱ्यांसाठी असलेले महत्त्वही विशद केले. गावातील अर्थव्यवस्था मजबूत आणि गतिशील करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. तसेच आयात कमी करून निर्यात वाढविणे व प्रत्येक क्षेत्रात आयातीला पर्याय निर्माण करण्यास प्राधान्य द्यावे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कोविड हे भयंकर संकट समाजावर, देशावर आले आहे. या संकटातून सुटण्याचा सर्वांचाच प्रयत्न आहे. पण कोविडच्या नियमावलीचे नागरिकांनी कडक पालन केले तर लॉकडाऊनची गरज पडणार नाही. कोविडसोबत जीवन जगण्याची पध्दतीही विकसित करावी लागणार असल्याचेही यावेळी गडकरी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले. महाराष्ट्रात गृह खात्यात जे झाले, ते चांगले नाही. या घटनेमुळे राज्याच्या विश्वसनीयतेला धक्का बसला असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ते पुढे म्हणाले की, भ्रष्टाचाराबाबत लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. देशाच्या लोकशाहीसाठी अशा घटना योग्य नाहीत. सनदशीर मार्गाने पैसा कमाविणे गुन्हा नाही. तसेच, राजकारण पैसा कमावण्याचा व्यवसाय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भ्रष्टाचाराला प्रतिबंध बसावा म्हणून अनेक कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. संपूर्ण शासकीय व्यवस्था-कार्यपध्दती डिजिटल, पारदर्शक, भ्रष्टाचारविरहित आणि वेळेत काम अशा पध्दतीची करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. व्यवस्था चांगली असेल तर भ्रष्टाचार होणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.