उच्चांकी ५३३८ बाधितांची भर, उच्चांकी ६६ मृत्यू

    दिनांक :07-Apr-2021
|
- आलेख चढताच
- रुग्णालयात रुग्णांची गर्दी
नागपूर, 
नागपूर जिल्ह्यात मागील २४ तासात १९१९१ चाचण्या, ५३३८ बाधित, ६६ मृत्यूची नोंद झाली असून हा कोरोनाच्या इतिहासात उच्चांक आहे. परिणामी बाधितांची संख्याही अडीच लाखांवर गेली. कोरोनाच्या आगमनापासून बाधित, मृत्यू व चाचण्यांचाही हा विक्रमच आहे.
 
ngp_1  H x W: 0
 
नागपूर शहरात आज ३२८३, ग्रामीणमध्ये २०४८, जिल्ह्याबाहेरील ७, असे ५३३८ बाधित झाले असून ग्रामीणचे ५६४१८, शहरातील १९६७३३ तसेच जिल्ह्याबाहेरील १०७० मिळून एकूण बाधितांची संख्या २५४२२१ झाली. मागील वर्षी मार्चमध्ये कोरोनाचे आगमन झाले. तेव्हापासून एप्रिलमध्ये ४११०, ४१०८ बाधितांची संख्या होती. काल १९१९१ विक्रमी नमुन्यांची चाचणी झाली. आरटीपीसीआर पद्धतीने १३५८४, रॅपिड अँटिजन पद्धतीने ५३९४८७ नमुन्यांची चाचणी झाली. मागील २४ तासात ग्रामीणमध्ये २५, शहरात ३४ तसेच जिल्ह्याबाहेरील ७, अशा ६६ बाधितांचा मृत्यू झाला. ही आतापर्यंती सर्वाधिक संख्या आहे. एकाच दिवशी ६५ मृत्यू सप्टेंबर २०२० मध्ये झाले आहेत. काल ३८६८ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत २०५७८४ कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे आजचे प्रमाण ८०.९५ टक्के आहे. ४२९३३ अ‍ॅक्टिव्ह बाधितांपैकी ११२३५ रुग्णालयात तसेच ३१६९८ गृहविलगित आहेत.
आलेख चढताच
मागील दीड महिन्यांपासून बाधितांचा हा आलेख निरंतर वाढत आहे. १५ फेब्रुवारीपासून वाढत असलेला हा आलेख खाली येतच नाहीय. दीड महिन्यात मृत्यूसंख्येत सुमारे पाचपट वाढ झाली. नागपूर जिल्ह्यातील २.१८ टक्के मृत्यूदर जगात सर्वाधिक ठरला आहे. दरम्यान, बाधितांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने रुग्णालयातील गर्दी प्रचंड वाढली आहे. सप्टेंबरमध्ये अशीच भयंकर स्थिती उद्भवली होती. तेव्हा रुग्णशय्येसाठी रुग्णालये शोधण्याची वेळ तेव्हा नागपूरकरांवर आली होती. तीच वेळ आताही आली आहे. रुग्णालयात दाखल करून घेताना रुग्णालय प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहे. मेडिकलमध्ये एका रुग्णशय्येवर दोन रुग्णांना बसवावे लागत आहे. रुग्णशय्यांपेक्षा रुग्ण जास्त अशी वेळ आली आहे. त्यातही प्राणवायूयुक्त रुग्णशय्यांचा तुटवडा आहे. कोरोनात नेमके प्राणवायूची गरज पडत असते.