मार्चमध्ये वाढल्या सेवा क्षेत्रातील हालचाली

    दिनांक :07-Apr-2021
|
- सर्वेक्षणातील निष्कर्ष
नवी दिल्ली,
कोरोना महामारीचा फटका बसलेल्या सेवा क्षेत्राच्या हालचाली मार्चमध्ये वाढल्या असून, या क्षेत्राची वृद्धी होत आहे. मात्र, अंतर्गत खर्च मात्र वाढला आहे, असा निष्कर्ष मासिक सर्वेक्षणात बुधवारी काढण्यात आला. परिस्थितीनुसार बदल होणार्‍या भारतीय सेवा क्षेत्राचा निर्देशांक फेब्रुवारीत 55.3 अंकावर घसरला होता. तो मार्चमध्ये 54.6 अंकांवर गेला आहे. मात्र, मागील सहा महिन्यांपासून यात वृद्धी होत असली, तरी याचा वेग कमीच असल्याचेही या अहवालात स्पष्ट झाले.

nat_1  H x W: 0 
 
मासिक निर्देशांकानुसार, 50 अंकांवरील निर्देशांक वृद्धी, तर त्याखालील निर्देशांक घसरण दर्शवितो. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा फायदा सेवा क्षेत्राला झाला आहे. परंतु, कोरोना महामारीमुळे ही वृद्धी रोखली जात आहे, अशी माहिती आयएचएस मार्किटच्या आर्थिक विभागाचे सहयोगी संचालक पॉलियना डी लिमा यांनी दिली. कोरोना महामारीचा पुन्हा झालेला उद्रेक आणि लादण्यात आलेले निर्बंध यामुळे एप्रिल महिन्यात या वृद्धीला फटका बसू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. सलग तेराव्या महिन्यात भारतीय सेवा क्षेत्राची विदेशातील मागणी घटल्याने या क्षेत्राची परिस्थिती थोडी खालावली आहे, असे मार्च महिन्याच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले.