अब्जाधीशांच्या संख्येत भारत तिसरा

    दिनांक :07-Apr-2021
|
- मुकेश अंबानी यांनी जॅक मा यांना मागे टाकले
न्यू यॉर्क, 
प्रतिष्ठित फोर्ब्ज मासिकाने जाहीर केलेल्या यादीतील अब्जाधीशांच्या संख्येत भारताने तिसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या आणि दुसर्‍या स्थानावर अनुक्रमे अमेरिका व चीन आहे. चीनमधील व्यावसायिक जॅक मा यांना मागे टाकून रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आशियातील सर्वांत धनाढ्य उद्योजकाचा मान पटकावला आहे, असे फोर्ब्जने स्पष्ट केले. फोर्ब्जने जाहीर केलेल्या 35 व्या वार्षिक यादीत अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक जेफ बेझोस यांनी सलग चौथ्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच्याकडे 177 अब्ज डॉलर्सची एकूण संपत्ती आहे. अ‍ॅमेझॉनच्या समभागांत आलेल्या तेजीमुळे मागील वर्षी त्यांच्या संपत्तीत 64 अब्ज डॉलर्सची भर पडली, असे फोर्ब्जने सांगितले.

nat_1  H x W: 0 
 
या यादीत दुसर्‍या स्थानावर स्पेस एक्सचे एलन मस्क आहेत. डॉलरचा विचार केला असता, त्यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. त्यांच्याकडे 151 अब्ज डॉलर्सची संपत्ती असून, मागील वर्षी ते 26.6 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 31 व्या क्रमांकावर होते. टेस्ला कंपनीच्या समभागांचे मूल्य 705 टक्क्यांनी वाढल्याने त्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, असे या मासिकाने स्पष्ट केले आहे. भारतातील सर्वांत धनाढ्य मुकेश अंबानी हे आशियातूनही श्रीमंत ठरले आहेत. त्यांच्याकडे 84.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. ते या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत. मागील वर्षी आशियातील सर्वांत धनाढ्य असलेल्या चीनच्या जॅक मा यांना त्यांनी मागे टाकले आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे धनाढ्य ठरले असून, या यादीत त्यांना 24 वे स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे एकूण 50.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर हे भारतातील तिसर्‍या क्रमांकाचे, तर फोर्ब्जच्या यादीत त्यांचा 71 वा क्रमांक आहे. त्यांच्याकडे एकूण 23.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
 
 
सायरस पूनावाला 169 व्या स्थानावरपूनावाला समूहाचे अध्यक्ष आणि सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पूनावाला यांनी फोर्ब्जच्या यादीत 169 वे स्थान पटकावले आहे. त्यांच्याकडे 12.7 अब्ज डॉलर्सची संपत्ती असल्याचे फोर्ब्जने म्हटले आहे. भारतातील धनाढ्यांमध्ये त्यांचा सातवा क्रमांक आहे. भारतातील तीन धनाढ्यांकडे 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे फोर्ब्जने म्हटले आहे.