मुख्तार अन्सारीची रवानगी बांदा तुरुंगात

    दिनांक :07-Apr-2021
|
बांदा, 
पंजाबमधील तुरुंगात दोन वर्षे काढल्यानंतर उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड आणि बसपाचा नेता मुख्तार अन्सारीची रवानगी येथील तुरुंगात करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
nat_1  H x W: 0
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तरप्रदेश पोलिसांनी रूपनगर तुरुंगातून मंगळवारी त्याचा ताबा घेतला आणि त्याला बांदा तुरुंगात हलवले. रूपनगर ते बांदा हा 900 किमीचा प्रवास पूर्ण करण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांना 14 तास लागले. त्याला बराक क्रमांक 15 मध्ये ठेवण्यात आले. तुरुंग परिसराभोवती सुरक्षा वाढविण्यात आली, अशी माहिती बांदाचे तुरुंगाधिकारी प्रमोद तिवारी यांनी दिली. अन्सारीवर चोवीस तास नजर ठेवण्यासाठी कोठडीत तीन रक्षक ठेवण्यात आले आहेत. त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी चार डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
 
आमदारकी जाणार!
 
उत्तरप्रदेशात आणल्यानंतर मुख्तार अन्सारीच्या अडचणी वाढत आहेत. त्याची आमदारकी रद्द करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकार कायदेशीर सल्ला घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील 24 वर्षांपासून आमदार असलेल्या अन्सारीची आमदारकी रद्द झाल्यास उत्तरप्रदेश सरकारला मोठे यश मिळेल.