अमरावती जिल्ह्यात टाळेबंदीला विरोध वाढला

    दिनांक :07-Apr-2021
|
- भाजपा, काँग्रेस, युवा स्वाभिमान आक्रमक
- विरोधासाठी संघटनाही सरसावल्या
 
अमरावती,
जिल्ह्यात 6 एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या अघोषीत टाळेबंदीला विरोध वाढला आहे. भाजपा, काँग्रेस, युवा स्वाभिमान व विविध संघटनांनी बुधवारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली. दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर पुढचा निर्णय आम्ही घेऊ असा इशाराही देण्यात आला आहे. 
 
taali_1  H x W:
 
भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवाल यांची भेट घेऊन संवाद साधला. जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या कमी असल्यामुळे तिसर्‍या टाळेबंदीची गरज नाही. या टाळेबंदीने व्यापारी, कामगार, हॉटेल संचालक, हातगाडीवाले व सर्व सामान्य नागरिक हैराण झाले. त्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. टाळेबंदी संयुक्तीक नाही आणि कोरोनावरचा तो उपयान सुद्धा नाही. या निर्बंधामुळे जनतेच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने टाळेबंदी शिथिल करून लसीकरणाची मोहीम पूर्ण क्षमतेने राबवावी, जनजागृती करावी, आवश्यकता असल्यास राजकीय पक्षाची मदत अशा सुचना भाजपाच्या शिष्टमंडळाने केल्या. शिथिलता न आणल्यास भाजपा तीव्र आंदोलन करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
 
 
यावेळी शहराध्यक्ष किरण पातुरकर, आ. प्रवीण पोटे, माजी आमदार सुनील देशमुख, डॉ. श्री अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे, प्रा. रवींद्र खांडेकर, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, मनपा सभागृह नेता तुषार भारतीय, जयंत डेहनकर, स्थायी समिती सभापती सचिन रासने, उपमहापौर कुसूम साहू, सरचिटणीस गजानन देशमुख, मंगेश खोंडे, दिपक खताडे, व्यापार आघाडीचे आत्माराम पुरसवाणी, राजेश आखेगांवकर, रविकिरण वाघमारे यांच्यासह अन्य हजर होते.
 
 
आ. खोडके व शहर काँग्रेसचाही विरोध
अमरावती शहरात लावण्यात आलेली टाळेबंदी शिथिल करण्याची मागणी शहर काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन करण्यात आली. शहराध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. तसेच अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून व फोनवर चर्चा करून टाळेबंदी शिथिल करण्याची मागणी केली.
 
 
युवा स्वाभिमानने दिले निवेदन
टाळेबंदीच्या विरोधात बुधवारी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांच्या मार्गदर्शनात निवेदन दिले. लावण्यात आलेले निर्बंध अमानविय आहे. सर्वच हैराण आहे. कोणताही विचार न करता टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. ही टाळेबंदी तातडीने हटविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
अनेक संघटना सरसावल्या
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी दिवसभर विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी येऊन टाळेबंदी विरोधात निवेदन दिले. सदर टाळेबंदी तातडीने हटविण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. तसेच टाळेबंदीच्या नियमातल्या उणिवा त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितल्या.
 
मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकार्‍यांनी दिली माहिती
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच होत असलेला विरोधही त्यांनी सांगितला. व्यापारी, राजकीय पक्ष, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्या भूमिकाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. उद्धव ठाकरे यांनी माहिती जाणून घेतली. लवकरच काही उपाय करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.