पंजाबच्या सीमेवर पाकिस्तानी तस्कर ठार

    दिनांक :07-Apr-2021
|
- हेरॉईन, दोन एके रायफली जप्त
अमृतसर,
22 किलो हेरॉईन आणि दोन एके रायफलींसह भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका पाकिस्तानी तस्कराला सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पंजाब पोलिस दलाने आंतरराष्ट्रीय सीमेवर संयुक्त कारवाई करीत गोळ्या घालून ठार केले, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

mat_1  H x W: 0 
 
मादकपदार्थांची खेप घेऊन पाकिस्तानी तस्कर घुसखोरी करणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे विशेष अधीक्षक ध्रुव दहिया यांच्या नेतृत्वात पंजाब पोलिस आणि बीएसएफने कक्कर चौकी परिसरात ही संयुक्त कारवाई केली. या पथकाला पाकिस्तानी तस्कराची हालचाल दिसली. जवानांनी आपल्याला घेरल्याचे लक्षात येताच त्याने गोळीबार केला. या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत त्याला ठार करण्यात आले, अशी माहिती अधिकार्‍याने दिली.
 
 
यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली असता, 22 किलो हेरॉईन, दोन एके-47 रायफली, 4 मॅग्झिन्स, पाकिस्तानी सिमकार्ड असलेला एक मोबाईल आणि 210 रुपयांचे पाकिस्तानी चलन जप्त करण्यात आले. गुरदासपूर येथील दोघांसोबत या पाकिस्तानी तस्कराची ओळख असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या दोघांचेही वास्तव्य सध्या बेल्जियममध्ये आहे आणि ते पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशार्‍यावर देशविरोधी कारवायांत गुंतले आहे, अशी माहिती ध्रुव दहिया यांनी दिली.