अर्जेंटिनाशी दोन हात करण्यास सज्ज : हरमनप्रीत सिंग

    दिनांक :07-Apr-2021
|
ब्यूनस आयरस, 
ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिना संघाविरुद्ध दोन हात करण्यास भारतीय हॉकी संघ सक्षम आहे, असा विश्वास भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंग याने व्यक्त केला. टोकियो ऑलिम्पिकपूर्वी आम्ही लयीत येण्यासाठी या अर्जेंटिना दौर्‍याचा उपयोग करणार असल्याचेही तो म्हणाला.
 
spo_1  H x W: 0
 
अर्जेंटिनाविरुद्ध सहा सामने खेळण्यासाठी 22 सदस्यांचा भारतीय संघ गत आठवड्यातच येथे दाखल झाला असून ते या दौर्‍यात 11 व 12 एप्रिल रोजी अर्जेंटिनाविरुद्ध दोन एफआयएच प्रो-लीग हॉकी सामने खेळणार असून चार सराव सामनेसुद्धा खेळणार आहे. यजमान देशाच्या हॉकी खेळण्याच्या शैलीशी जुळवून घेणे हीच भारतीय संघाच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. आम्ही युरोपमध्ये खेळलेल्या संघांच्या तुलनेत अर्जेंटिनाची खेळाची शैली थोडी वेगळी आहे, असे तो म्हणाला. आम्ही या दौर्‍याकडे टोकियो ऑलिम्पिकपूर्वी लयीत येण्याची संधी म्हणून बघतो. जगातील सर्वच संघ ऑलिम्पिकपूर्वी सामन्यांच्या सरावासाठी प्रयत्न करीत आहेत व आम्ही काही वेगळे नाही. आम्हाला अधिकाधिक सामने खेळायला मिळाले, असेही तो म्हणाला. ऑलिम्पिक विजेत्या संघाविरुद्ध खेळणे आव्हानात्मक असेल, परंतु आमच्याकडे असलेला अनुभव व कौशल्याच्या जोरावर आम्हीच विजयी होवू, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
 
 
अलीकडच्या काळात हरमनप्रीत हा भारतीय संघातील सर्वाधिक सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू आहे. गत महिन्यात युरोप दौर्‍यादरम्यान तो जबरदस्त फॉर्मात होता व भारतीय संघ अपराजित राहिला. युरोप दौर्‍यामुळे भारतीय संघ जबरदस्त पद्धतीने आकारास आला. गतवर्षी कोरोनाच्या पृष्ठभूमीवरील टाळेबंदीच्या काळात आम्ही घरीच आपल्या तंदुरुस्तीवर कठोर मेहनत घेतली, याचा मला आनंद झाला, असे ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत म्हणाला. आम्ही खेळाच्या तंत्रावर तसेच गोल नोंदविण्याच्या कार्यावरही मेहनत घेतली. आता अर्जेटिनामध्येही आम्ही अधिक उत्कृष्ट कामगिरी करू शकतो, अशी आशा त्याने व्यक्त केली. 2018 साली ब्रेडा येथे भारताच्या पुरुष हॉकी संघाने अर्जेंटिनावर 2-1 असा विजय नोंदविला होता. त्यावेळी भारत अर्जेंटिनाविरुद्ध अखेरचे खेळले होते. मनप्रीत सिंग व रूपिंदर पाल सिंगसारख्या अनुभवी खेळाडूंचे संघात पुनरागमन झाल्यामुळे अर्जेंटिनाविरुद्ध आम्ही त्यांच्या तोडीचा खेळ करू. त्यांच्या समावेशाने संघाचे मनोबल उंचावले आहे, असे तो शेवटी म्हणाला. मनप्रीत व रूपिंदरने आपल्या कारकीर्दीत अनेक उतार-चढाव अनुभवले आहे व उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
---