महाराष्ट्रावर लसीकरणाचे गंभीर संकट

    दिनांक :07-Apr-2021
|
- राजेश टोपेंनी व्यक्त केली चिंता
मुंबई,
राज्यात कोरोनाचा थैमान काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे. रोज रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता राज्यापुढे आणखी एक मोठे संकट उभे राहिले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दल माहिती दिली.' प्रकाश जावडेकर यांनी तीन लाख लसीकरण करत असताना सहा लाख करण्यास सांगितले. केंद्र सरकारकडून डोस पुरवले जातील असे सांगण्यात आले.
 
 
tope_1  H x W:
 
आम्ही साडे चार लाखांपर्यंत पोहोचलो असून लवकरच सहा लाखांपर्यंत जाऊ. पण साडे चार लाखांमध्येच लस नाही म्हणून केंद्र बंद ठेवावे लागत आहेत. लोक तिथे येत असून आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस नाही असे सांगण्याची वेळ आली आहे. या सर्व गोष्टीला लसीचा न होणारा पुरवठा कारणीभूत आहे,' अशी खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली. नुकतीच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या बैठकीत राजेश टोपे यांनी लसीकरण, ऑक्सिजन तसेच रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही महत्वाच्या सूचना केल्या.
महाराष्ट्रात १४ लाख लसींचे डोस शिल्लक असून हा साठा केवळ तीन दिवस पुरेल अशी भीती व्यक्त करताना राजेश टोपे यांनी दर आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. ''महाराष्ट्रात लसीचे १४ लाख डोस शिल्लक असून ही तीन दिवसांपुरता साठा आहे. पाच लाखांच्या तुलनेत हे डोस तीन दिवसांत संपेल आणि महाराष्ट्रातील लसीकरण बंद होऊ शकेल. म्हणूनच दर आठवड्याला किमान ४० लाख लस पुरवठा केला पाहिजे. आज आम्ही साडे चार ते पाच लाखांपर्यंत आहोत. पण दोन दिवसांत दिवसाला सहा लाखांपर्यंत जाण्याची हमी मी देतो,' असे ते म्हणाले. 'केंद्र सरकार लस पाठवत नाही असे नाही पण वेग कमी आहे. ज्या पद्धतीने आव्हानात्मक बोललंले जाते त्यापद्दतीने केले जात नाही हे केंद्र सरकारला सांगणं आहे,' अशी टीका राजेश टोपे यांनी केली. यावेळी त्यांनी थोडी जरी लक्षणे जाणवली तर लगेच चाचणी करुन घ्या. अंगावर दुखणं काढू नका असे आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केले.