राज्याच्या नियमावलीत आणखी काही बदल

    दिनांक :07-Apr-2021
|
- सार्वजनिक वाहतूक, कृषीक्षेत्राशी संबंधित व्यवसायांना परवानगी
मुंबई,
राज्यातील कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने 5 एप्रिल रोजी निर्बंधांचे आदेश आणि नियमावली जाहीर केली होती. या नियमांमध्ये पुन्हा एकदा काही बदल करण्यात आले असून, काही सेवांना सूट देण्यात आली आहे.
 
maha_1  H x W:
 
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही अटींसह सर्व प्रासंगिक सेवांसह सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. विमानतळावर मालमत्तेची हाताळणी, तिकीट सेवा इत्यादी सेवांना सूट देण्यात आली आहे. यासह परवानगी असलेल्या उत्पादनांच्या उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सर्व अनुषंगिक कामांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच उत्पादन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या आणि तयार झालेले उत्पादन पाठविण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे, कार्यालयीन प्रक्रियेला सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. 500 पेक्षा जास्त कामगार असणार्‍या उद्योगांनी आपल्या कामगारांसाठी सर्व सुविधायुक्त विलगीकरण केंद्र उभारण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. याबातची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन उपरोक्त माहिती प्रधान सचिव असिम गुप्ता यांनी दिली आहे.
 
 
कृषी क्षेत्राशी संबंधित आवश्यक सुविधा, बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांची दुरुस्ती यांचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आला आहे. चिकन, कुक्कुटपालन केंद्र, मटण, अंडी, मासे विक्रीची दुकाने यांना देखील अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी देण्यात आली आहे. सेबीने मान्यता दिलेल्या बाजारातील मूलभूत सुविधा, दूरसंचार सेवा आणि गॅस सिलेंडर सुविधांना देखील अत्यावश्यक सेवेअंतर्गत परवानगी देण्यात आली आहे.