घरोघरी लसीकरण सुरू करा

    दिनांक :07-Apr-2021
|
मुंबई,
राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पृष्ठभूमीवर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग व्यक्तींना घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस द्यावी, अशी विनंती करीत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत राज्य सरकारसह, मुंबई महापालिका आणि केंद्र सरकारलाही प्रतिवादी करण्यात आले. 
 
vaccine _1  H x
 
केंद्र सरकारने ज्येष्ठ आणि विशेष नागरिकांच्या बाबतीत घरोघरी जाऊन लसीकरणाची परवानगी देत धोरण निश्चित करावे, अशी मागणी वकील ध्रुती कपाडिया आणि कुणाल तिवारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत केली आहे.
 
 
75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी आभासी नोंदणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या वतीने एखादी हेल्पलाईन तयार केली, तर ते त्यावरून लसीसाठी नोंदणी करू शकतात. ज्येष्ठ नागरिकांना अनेक शारीरिक व्याधी असतात. त्यामुळे त्यांना लस घेण्यासाठी रुग्णालयापर्यंत जाणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरणाची मोहीम सुरू केली, तर हितकारक ठरेल, असा दावा याचिकेतून केलेला आहे.
 
 
दिव्यांग व्यक्तींना देखील लस घेण्यासाठी अनेक अडचणींतून जावे लागत आहे. त्यांनाही नोंदणी करणे, प्रत्यक्ष लसीकरणासाठी जाणे यासाठी अन्य व्यक्तींवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे त्यांना देखील अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. ही सुविधा पुरविताना महापालिकेने नुकसान टाळण्यासाठी 500 रुपये शुल्क आकारावे, असे याचिकेत सुचवण्यात आले आहे.