कोरोनाविरोधी लढ्यात सर्वप्रकारची काळजी घ्या

    दिनांक :07-Apr-2021
|
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
नवी दिल्ली, 
कोरोनाविरोधी लढ्यात मुखाच्छादन घालणे, नियमित हात धुण्यासह इतर मानक संचालन प्रक्रियांचे पालन करून सर्व प्रकारची काळजी घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागितक आरोग्य दिनानिमित्त बुधवारी नागरिकांना केले. कोरोना संसर्गाचा वेग वाढत आहे. मागील तीन दिवसांत दररोज एक लाखांपेक्षा जास्त बाधित आढळत आहेत. या पृष्ठभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी उपरोक्त आवाहन केले. आपली पृथ्वी निरोगी ठेवण्यासाठी दिवसरात्र काम करणार्‍या कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याठी आजचा हा जागतिक आरोग्य दिन असल्याचे ट्विट त्यांनी केले. आरोग्य सेवेतील संशोधन आणि नाविन्यास समर्थन देण्याच्या आमच्या बांधिलकीचा पुनरुच्चार करण्याचा देखील हा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.
 
modi_1  H x W:
 
मुखाच्छादन घालणे, सतत हात धुणे आणि इतर मानक संचालन प्रक्रियांचे पालन करून कोरोनाविरोधी लढा द्यावा, असे त्यांनी पाठोपाठ केलेल्या ट्विट्समध्ये म्हटले. निरोगी राहण्यासाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती पावले उचलावी. नागरिकांना उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत आणि पंतप्रधान जनऔषधी योजनांसारख्या उपाययोजना केल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कोरोनाविरोधी लढ्यासाठी देशात सुरू करण्यात आलेली लसीकरण मोहीम ही जगातील सर्वांत मोठी आहे, असेही त्यांनी सांगितले.