माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांसंदर्भातील अहवाल मुंबई पोलिसांकडून गृहखात्याला पाठविण्यात आल्याचे कळत आहे. या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश गृहखात्याने मुंबई पोलिसांना दिले होते. मुंबई पोलीस खात्याकडून देण्यात आलेल्या अहवालामध्ये काही धक्कादायक बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. सचिन वाझेंना गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांचा विरोध असतानाही तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी स्वतःहून पुढाकार घेत वाझेंना पोलीस खात्यात सामावून घेतल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. जून 2020 मध्ये पोलीस खात्यात पुन्हा सामावून घेण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी सचिन वाझेंना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यास सुरुवात केली होती. मुंबई पोलिसांकडे येणारे हाय प्रोफाईल प्रकरण केवळ सचिन वाझे यांच्याकडे तपासाला दिली जात होती असं या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
मुकेश अंबानींच्या अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात निलंबित अधिकारी सचिन वाझेंना एनआयएने अटक केल्यानंतर परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप लावले होते. यासंदर्भात गृह खात्याकडून मुंबई पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.