टाळेबंदीचे भीषण परिणाम होतील

    दिनांक :07-Apr-2021
|
- जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
नवी दिल्ली,
देशात कोरोनाची नवी लाट आल्यानंतर अनेक भागांमध्ये टाळेबंदीसारखा निर्णय घेतला जात आहे. मात्र, या टाळेबंदीचे भीषण परिणाम नागरिकांनाच भोगावे लागणार आहेत, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन् यांनी दिला आहे.
 
nat_1  H x W: 0
 
देशातील दुसर्‍या लाटेला रोखण्यासाठी जनतेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, असे स्वामिनाथन् यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. टाळेबंदी हा उपाय असू शकत नाही. टाळेबंदीच्या काळात लोक घरात राहतील आणि टाळेबंदी उठताच लोक घराबाहेर निघतील. त्यानंतर बाधितांच्या संख्येत प्रचंड मोठी वाढ होऊ शकते, असे त्या म्हणाल्या. लसीकरणाचा मोठा टप्पा गाठेपर्यंत आपल्याला कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागू शकतो. यात आणखी बर्‍याच लाटा असू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
कोव्हिशिल्ड लसीच्या दोन मात्रांच्या काळात 8 ते 12 आठवड्यांच्या अवधी ठेवण्याची शिफारस त्यांनी केली आहे. सध्या लहान मुलांना लस देण्याची आवश्यकता नाही, पण दोन मात्रांमधील कालावधी 8 ते 12 आठवड्यांपर्यंत वाढवता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या विभागीय संचालक डॉ. पूनम खेत्रीपाल यांनीही लसीकरणावर भर दिला आहे. आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त बोलताना त्या म्हणाल्या की, कोरोना संक्रमणाची नवीन लाट संपूर्ण देशात पसरत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.