अमेरिका कोरोना मुक्तीच्या दिशेने

    दिनांक :07-Apr-2021
|
वॉशिंग्टन,
राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेतील प्रत्येक प्रौढ नागरिकाला १९ एप्रिलपर्यंत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत अमेरिकेतील १५ कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. यावरून अमेरिका आता कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेत आतापर्यंत ५ लाख ५४ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. जगात कोरोना बळींची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत फायजर-बायोएनटेक, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसींचा वापर करण्यात येत आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता भारतात देखील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्याची मागणी महाराष्ट्रासह इतर राज्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

america _1  H x 
राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर १०० दिवसांमध्ये १० कोटी लोकांचे लसीकरण करण्याचा निर्धार जो बायडन यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर अवघ्या ७५ दिवसांमध्ये १५ कोटी जणांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी २५ दिवसांमध्ये आणखी ५ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट अमेरिकन प्रशासनाने ठेवले आहे.
 
राष्ट्राध्यक्ष बायडन म्हणाले, आणखी काही गोष्टी साध्य करायच्या आहेत, अजूनही आपण विजयी झालेलो नाही. लसीकरणाद्वारेच महासाथीच्या आजाराला पराभूत करता येणे शक्य आहे. लवकरच चांगले दिवस येणार आहेत. जुलै महिन्यापासून आपण सर्व सुरक्षित व आनंदी वातावरणात आपल्या मित्र परिवारासोबत पूर्वीसारखे वावरू. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून रुग्णालये अपुरी पडत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कोरोनाविरोधात आपण सर्व संघर्ष करत आहोत. अधिकाधिक लोकांना लस दिली जात नाही, तोपर्यंत कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन बायडन यांनी केले.