सॅमसन-संगकाराच्या भागीदारीने राजस्थान रॉयल्स यशस्वी होईल ?

    दिनांक :07-Apr-2021
|
मुंबई,
पुनर्रचित राजस्थान रॉयल्सने नवीन वारसा निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, परंतु कमकुवत भारतीय तुकडी आणि विदेशी खेळाडूंवर अधिक अवलंबून राहणे यामुळे आयपीएल मोसमाच्या सलामीच्या सामन्यात विजयाच्या संधीला धक्का बसू शकतो. गत मोसमाच्या तुलनेत यंदा राजस्थान रॉयल्सने व्यवस्थापनात तसेच संघनेतृत्वात काही बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या जागी संजू सॅमसनची कर्णधारपदी, तर अ‍ॅण्ड्रयू मॅकडोनाल्डच्या जागी श्रीलंकेचे दिग्गज कुमार संगकाराची क्रिकेट संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
 
sport_1  H x W:
 
गत मोसमात वेगवान गोलंदाजीचा भार जोफ्रा आर्चरवर अवलंबून असायचा, मात्र यंदा त्याला साथ देण्यासाठी राजस्थानने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिसला खरेदी केले. ख्रिस मॉरिसला तब्बल 16.25 कोटी रुपयांत खरेदी केले असून तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तथापि, गत मोसमात सर्वाधिक मूल्यवान खेळाडू म्हणून निवड झालेल्या आर्चेरला दुखापत झाली आहे, त्याला किमान पहिल्या काही सामन्याला मुकावे लागेल, हा आरआरसाठी मोठा धक्का असेल. आगामी 12 एप्रिल रोजी मुंबईत पंजाब किंग्ज व राजस्थान रॉयल्स यांच्यात पहिला सामना होणार आहे. अनेक धडाकेबाज फलंदाज ही राजस्थान रॉयल्सची जमेची बाजू आहे. जोस बटलर व बेन स्टोक्स हे दोन सामने जिंकून देणारे खेळाडू आहेत. सॅम सॅमसन हासुद्धा प्रतिभेचा धनी असून तो कोणत्याही आक्रमणाला पायदळी तुडवू शकतो. दक्षिण आफ्रिकेचे डेव्हिड मिलर व ख्रिस मॉरिस हे आणखी दोन शक्तिशाली आक्रमक खेळाडू आहेत आणि इंग्लंडचा टी-20 तज्ज्ञ खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन हासुद्धा सामन्याला कलाटणी देणारा खेळाडू आहे.
 
 
गत मोसमात अष्टपैलू राहुल तेवतियानेसुद्धा चेंडू स्टेडियमच्या बाहेर फटकावून आपल्या क्षमतेचा परिचय करून दिला होता. श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा राजस्थान रॉयल्सच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. संगकाराकडे क्रिकेटचा भरपूर अनुभव असून त्याच्या रूपाने राजस्थानला सर्वात चतुरस्त्र मार्गदर्शक मिळाला आहे. मात्र राजस्थानची सर्वात मोठी अडचण म्हणजे सातत्याचा अभाव असलेले भारतीय खेळाडू. गत काही वर्षांत सॅमसनने कोणत्याही स्पर्धेत क्वचितच सलग पाच सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. 2018 मध्ये आरआरने 11.5 कोटी रूपयांत वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला खरेदी केले, परंतु तो निष्प्रभ ठरला, तर मनन वोहराने क्वचितच चमकदार कामगिरी केली. त्यांच्या मदतीसाठी रियान पराग व वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीसह यशस्वी जयस्वाल व कार्तिक त्यागी आहे. सूर्यकुमार यादव व ईशान किशनने टी-20 पदार्पणात शानदार कामगिरी केली आहे. सॅमसनचा फॉर्म व सातत्य नेहमीच एक प्रश्नचिन्ह राहिले आहे. टी-20 मध्ये मिळालेल्या संधीचे सोने करण्यात तो अपयशी ठरला आहे. मात्र आयपीएलच्या निमित्ताने केरळच्या या यष्टिरक्षक-फलंदाजाला टी-20 विश्वचषकाची भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी चांगली संधी मिळाली आहे. फलंदाजीत सातत्य व आपले नेतृत्व कौशल्य सिद्ध करण्यासाठी सॅमसनला ही एक उत्तम संधी आहे.