महिनाभरात महायुद्धाला सुरुवात?

    दिनांक :07-Apr-2021
|
मॉस्को,
रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियन विश्लेषकांनी आगामी चार आठवड्यांमध्ये महायुद्ध सुरू होणार असल्याचा इशारा दिला आहे. तणाव न निवळल्यास एका महिन्यातच करोना महासाथीच्या काळात भीषण युद्धाचा सामना करावा लागणार असल्याचा इशारा संरक्षण तज्ज्ञांनी दिला आहे. युक्रेन हा अमेरिकेचा मित्र देश आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये जर युद्ध झाल्यास त्याचे रुपांतर महायुद्धात होण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे. त्यामुळे एकंदरीत विचार केल्यास जग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे बोलले जात आहे. 
 
ww _1  H x W: 0
रशिया आणि अमेरिका यांच्यात असलेली दुश्मनी लक्षात घेता रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास अमेरिकाही या युद्धात उतरण्याची शक्यता आहे. त्यानंतर इतर देशही सहभागी होतील. काही दिवसांपूर्वीच शस्त्र साठा असलेला एक मालवाहू जहाज अमेरिकेहून युक्रेनमध्ये दाखल झाले आहे. रशियाने वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चार हजार जवानांना वादग्रस्त सीमा रेषेवर पाठवले आहे. रशियन सैन्याच्या हालचालींमुळे युरोपीयन देशही सतर्क झाले आहेत. त्यामुळे महायुद्ध होण्याचा धोका असल्याचे म्हटले जात आहे.
 
स्थानिक वृत्तानुसार, सध्याच्या परिस्थितीनुसार येत्या काही आठवड्यात युरोपमध्ये महायुद्धासारखी मोठी घटना घडण्याचा धोका आहे. हा धोका वाढत असून माध्यमांमध्ये याची चर्चा न होणे हे चिंताजनक असल्याचे रशियन संरक्षण तज्ज्ञ पॉवेल फेलगेनहर म्हणाले. मागील आठवड्यात युक्रेनचे कमांडर-इन-चीफ रुसलान खोमच यांनी संसदेत सांगितले की, रशियाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. रशियाने कमीत कमी अतिरिक्त २५ टेक्टिक ग्रुपच्या जवानांना सीमा भागात तैनात केले आहे. याआधीपासून युक्रेनच्या सीमा भागात रशियन सैन्य दाखल आहेत. तर, रशियाने चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. लष्कराची हालचाल सुरू असली तरी युद्धाची तयारी सुरू नसल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे.