प्रयोगशाळेत कृत्रिम यकृत निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित

    दिनांक :08-Apr-2021
|
- उंदरावरील प्रयोगाला ब्राझीलमध्ये यश
- प्रत्यारोपणातील समस्या सुटणार
ब्रासिलिया,
ब्राझीलमधील साओ पाउलो विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायो-सायन्सेसमधील ह्युमन जीनोम अ‍ॅण्ड स्टेम सेल रिसर्च सेंटरने मानवाचे कृत्रिम यकृत तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांना आता प्रयोगशाळेत यकृताची कृत्रिम निर्मिती, त्यावर वैद्यकीय उपचार करणे शक्य होणार असून, मानवी आरोग्य क्षेत्रातील ही मोठी क्रांती मानली जात आहे. शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत उंदराचे यकृत निर्माण केले असून, ते यशस्वीरीत्या काम करीत आहे. या संंदर्भातील संशोधन मटेरियल्स सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. हेच अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून मानवाचे कृत्रिम यकृत तयार करण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या कृत्रिम यकृताची निर्मिती आणि प्रत्यारोपणाच्या मोठ्या प्रयोगात यश आल्यास, आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती घडेल, असा दावाही शास्त्रज्ञांनी केला आहे.

int_1  H x W: 0 
 
या अभ्यासातील प्रमुख संशोधक लुईज कार्लोज डी केयर्स ज्युनिअर यांनी सांगितले की, आम्ही मानवावर प्रत्यारोपित होऊ शकणार्‍या कृत्रिम यकृतांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यास उत्सुक आहोत. यातून यकृत प्रत्यारोपणासंबंधी अनेक समस्यांचा (दानदात्यांचा शोध, वैद्यकीय-कायदेशीर बाबी आदी.) सामना करणार्‍या लोकांना नक्कीच फायदा मिळू शकेल. शास्त्रज्ञांचे एक पथक मानवाच्या शरीरानुसार यकृत निर्मितीवर कार्य करीत आहे. शरीराने हा कृत्रिम अवयव नाकारू नये, यावर मुख्यत्वे भर देण्यात येत असल्याचेही लुईज कार्लोज म्हणाले. कृत्रिम यकृत तयार करण्याच्या प्रक्रियेत ‘डिसेल्युलायझरेशन’ म्हणजे बायोमेडिकल इंजिनीअरिंगमधून एक्स्ट्रासेल्यूलर मॅट्रिक्सला उतकांपासून अलग करण्यात येते.
 
 
निर्मितीसंबंधी महत्त्वाच्या प्रक्रियेत प्रयोगशाळेत मानवी यकृताला विविध प्रकारच्या मेडिकल डिटर्जंट आणि एन्जाईमद्वारे धुण्यात येते. यातून एक्स्ट्रासेल्यूलर मॅट्रिक्सचे विलगीकरण करण्यात येते. परंतु, शरीरात असतो तसाच त्याचा आकार कायम राहतो. यानंतर मॅट्रिक्स रुग्णाच्या पेशींसोबत मिसळण्यात येते. यातून मॅट्रिक्स हे मानवी शरीराच्या प्रतिरोधक क्षमतानुसार आकार घेते. अर्थातच प्रयोगशाळेत तयार केलेले कृत्रिम यकृत रुग्णाचे शरीर सामान्य पद्धतीने स्वीकारते. ते नाकारत नाही आणि शेवटी ते एकदम अस्सल यकृतासारखे काम करते, असेही लुईज यांनी स्पष्ट केले.
 
 
सध्या अनेक अडथळे
 
लुईज यांनी सांगितले की, सध्याच्या काळात अवयव प्रत्यारोपणासाठी अनेक देशात वैद्यकीय बाबी कायदेशीररित्या अतिशय कठीण बनल्या आहेत. त्यामुळे जगात लाखो रुग्णांना ताटकळत राहावे लागते. उपयुक्त यकृताची प्राप्ती, दाता व्यक्ती यासारख्या गोष्टी विनासायास प्राप्त होणे आणि त्यानंतरही रुग्णाच्या नातेवाईकांशी सहमत घडून येणे, या प्रक्रिया कठीण असल्याचे अनेकदा अनुभवास येते. आता मात्र सर्व अडचणींवर मात करता येणे शक्य झाले आहे.