बॅनर्जींवरील काँग्रेसची ‘ममता' जागी!

    दिनांक :08-Apr-2021
|
दिल्ली वार्तापत्र
श्यामकांत जहागीरदार
 
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत, आणखी पाच टप्पे बाकी आहेत. राज्यात तृणमूल काँग्रेस, भाजपा तसेच काँग्रेस आणि डावे पक्ष अशी तिरंगी लढत अपेक्षित होती, प्रत्यक्ष आता तृणमूल काँग्रेस आणि भाजपा अशी सरळ काट्याची लढत होत आहे. या लढतीत कोण बाजी मारणार? भाजपा की तृणमूल काँग्रेस? हे २ मे रोजीच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. पण, भाजपाचा वाढता जोर आणि प्रभाव पाहता, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम मतदारसंघात स्वत:च्या आणि राज्यात तृणमूल काँग्रेसच्या पराभवाची चिंता भेडसावू लागली आहे. स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही, तर सरकार स्थापनेसाठी काँग्रेसने आपल्याला पाqठबा द्यावा, अशा हालचाली ममता बॅनर्जी यांनी आतापासून सुरू केल्या आहेत.
दिल्लीत नायब राज्यपालांना जास्त अधिकार देण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या भूमिकेच्या विरोधात सर्व भाजपेतर पक्षांनी एकत्र येण्याचे ममता बॅनर्जी यांचे आवाहन, हा त्या योजनेचा भाग म्हणावा लागेल. ममता बॅनर्जी यांनी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद द केजरीवाल यांचे निमित्त करत सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवत एकत्र येण्याचे आवाहन केले असले, तरी त्यांचे मुख्य उद्दिष्ट बंगालमधील निवडणुकीनंतरची संभाव्य स्थिती हेच आहे.
 
 
 
mb _1  H x W: 0
 
लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अधिररंजन चौधरी यांनीही नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्या, तर राज्यात तृणमूल काँग्रेसच्या पराभवाची म्हणजे तिला बहुमत न मिळण्याची आशंका व्यक्त केली आहे. आवश्यकता पडली तर तृणमूल काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करण्याची सशर्त तयारीही चौधरी यांनी दर्शवली आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील आपले उमेदवार मागे घेत काँग्रेसला पाठींबा  देण्याचे आवाहन चौधरी यांनी केले आहे. फक्त एकट्या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेवरही चौधरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर ममता बॅनर्जी यांची भूमिका समजू शकली नाही. मात्र, ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील आपले उमेदवार मागे घेतले नाहीत, तरी त्यांना पाठिंबा देण्याशिवाय काँग्रेसमोर पर्याय नाही. डावे पक्ष ममता बॅनर्जी यांना सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची शक्यता नसली तरी काँग्रेस मात्र पाठिंबा देऊ शकते. ममता बॅनर्जी यांना डावे पक्ष आपला मुख्य शत्रू मानतात. मात्र, डाव्या पक्षांची स्थितीही राज्यात फारशी चांगली नाही. ज्योती बसू आणि बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यानंतर नाव घेण्यासारखा माकपा नेता राज्यात उरला नाही. डाव्या पक्षातही बंगालमधील डावे आणि केरळमधील डावे पक्ष, अशी उभी फूट आहे. बंगालमधील डावे पक्ष सीताराम येचुरी आणि प्रकाश कारथसारख्या नेत्यांना बाहेरचे नेते मानतात, त्यामुळे राज्यात फारसा हस्तक्षेप करू देत नाहीत. त्यामुळे यावेळी डावे पक्षही पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे दिसत नाही.
 
 
२०१६ च्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी होती. या आघाडीने दुस-या क्रमांकाच्या ७० जागा जिंकल्या होत्या. यात काँग्रेसच्या ४४, तर डाव्या पक्षांच्या २६ जागांचा समावेश होता. गत निवडणुकीत राज्यात भाजपाचे फारसे अस्तित्व नव्हते. भाजपाचे फक्त तीन उमेदवार विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र राज्यात भाजपाचा प्रभाव वाढू लागला. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत तर राज्यात भाजपाची सत्ता येण्याची स्थिती निर्माण झाली आहे आणि नेमका हाच मुद्दा काँग्रेसच्या पोटात दुखणारा आहे. कोणत्याही स्थितीत राज्यात भाजपाची सत्ता येऊ नये, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तिरंगी लढतीत भाजपाविरोधी मतांचे विभाजन होऊन भाजपाचा फायदा होऊ नये म्हणून काँग्रेसने राज्यात दुय्यम भूमिका पत्करली आहे. त्यामुळेच काँग्रेस फार ताकदीने यावेळची निवडणूक लढवताना दिसत नाही. यासाठी केरळमधील राजकीय परिस्थितीचा दाखला दिला जात असला, तरी ते एकमेव कारण नाही. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांसोबत आघाडी करून निवडणूक लढवणारी काँग्रेस, केरळमध्ये मात्र डाव्यांच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरली आहे. हा राजकीय विरोधाभास बंगालमध्ये आपल्याला अडचणीचा ठरू शकतो, याची जाणीव असल्यामुळे काँग्रेसचे कोणतेही राष्ट्रीय नेते म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वढेरा आतापर्यंतच्या तीन टप्प्यांतील प्रचारासाठी राज्यात आले नाहीत. पुढल्या पाच टप्प्यांतील प्रचारातही हे नेते राज्यात येण्याची शक्यता कमी वाटते. यामागची खरी गोम ही तृणमूल काँग्रेससाठी राज्यात मोकळे रान सोडण्याची आहे. आपला पराभव झाला, आपल्याला कमी जागा मिळाल्या तरी चालेल, पण राज्यात कोणत्याही स्थितीत भाजपा विजयी होऊ नये, ही काँग्रेसच्या नेतृत्वाची भूमिका असल्याचे समजते. म्हणूनच राज्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर विशेषत: ममता बॅनर्जी यांच्यावर टीका न करता भाजपाला आपल्या प्रचारात लक्ष्य करण्याचे निर्देश दिल्लीवरून राज्यातील नेत्यांना देण्यात आले आहेत. यावेळी राज्यात काँग्रेसची कामगिरी फारशी दमदार राहण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या आणखी एका राज्यातील पराभवाचे खापर राहुल गांधी यांच्या डोक्यावर फुटू नये, हेही यामागचे आणखी एक कारण मानले जाते.
 
 
राज्यात काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला कोणत्याही स्थितीत २० ते २५ पेक्षा जास्त जागा मिळू शकत नाहीत. काँग्रेसला दोन आकडी जागा मिळाल्या तरी तिने आपल्याला लॉटरी लागल्याचे समजण्यासारखी स्थिती आहे. ममता बॅनर्जी या मूळच्या काँग्रेसीच आहेत. राजीव गांधी यांनी पश्चिम बंगालमध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनवत त्यांच्या राजकीय कारकीर्दीला गती दिली. खासदारही बनवले. मात्र, पुढे सोनिया गांधींशी त्यांचे जमले नाही. स्थानिक नेतृत्वाशी मतभेद झाल्याच्या मुद्यावरून १९९८ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. मात्र, आपल्या नव्या पक्षाच्या नावात काँग्रेस राहील, अशी काळजी घेतली. ‘दीदी' नावाने बंगालमध्येच नाही तर संपूर्ण देशात परिचित ममता बॅनर्जी या अतिशय आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. बंगालमध्ये त्यांना ‘पिशी'पण म्हणतात. मराठी पिशी शब्दाचा अर्थ वेगळा आहे, तर बंगालीत पिशी म्हणजे आत्या, असा आहे.
 
डाव्या पक्षांच्या सरकारविरुद्ध त्यांनी राज्यात जोरदार संघर्ष केला. ३४ वर्षांच्या डाव्या पक्षाच्या राज्यातील राजवटीला सुरुंग लावला. सुरुवातीला काँग्रेसच्या नेतृत्वाच्या वा-यालाही उभ्या न राहणा-या ममता बॅनर्जी यांच्यावर राज्यातील भाजपाच्या वाढत्या प्रभावामुळे आपल्या राजकीय अस्तित्वासाठी काँग्रेसच्या आश्रयाला जाण्याची वेळ आली आहे. एकेकाळी सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी एकदुस-याचे तोंड पाहायलाही तयार नसत. सोनिया गांधींनी बोलावल्यावरही ममता बॅनर्जी संपुआच्या बैठकीला उपस्थित राहात नव्हत्या. कामगार संघटनांच्या बंदला पश्चिम बंगालमध्ये हिंसक वळण लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर जोरदार हल्ला चढवला होता. भाजपाच्या वाढत्या प्रभावाचा फटका दोघींनाही बसला. त्यामुळे या दोघींना आपले राजकीय मतभेद विसरत आपल्या राजकीय अस्तित्वासाठी एकत्र येण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे मध्यंतरी सीएए आणि जीएसटीच्या मुद्यावर सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित राहिल्या. या बैठकीत ‘पहिले आप... पहिले आप...'चा प्रयोगही झाला. बैठकीचे संचालन तुम्ही करा, असे सोनिया गांधी त्यांना म्हणाल्या, तर तुम्ही असताना मी बैठकीचे संचालन कसे करू, असे ममता बॅनर्जी उत्तरल्या.
 
पश्चिम बंगालमधील यावेळच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. आपला मूळ मतदारसंघ बदलून यावेळी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मोठा जुगार ममता बॅनर्जी खेळल्या आहेत. नंदीग्राम मतदारसंघात पराभव झाला, तर त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द संकटात सापडणार आहे, राजकारणात आतापर्यंत त्यांनी जे कमावले, ते गमावण्याची वेळ त्यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही! मात्र, यदाकदा त्या नंदीग्राममध्ये विजयी झाल्या आणि तृणमूल काँग्रेसला त्यांनी निसटते का होईना बहुमत मिळवून दिले, तर कट्टर मोदीविरोधक नेत्या म्हणून देशातील समस्त विरोधी पक्षांचे नेतृत्व त्यांच्याकडे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काँग्रेसची बॅनर्जींवरील ‘ममता' उगीचच जागी झाली नाही...!
९८८१७१७८१७