पाकिस्तान सुरू ठेवणार शिनजियांग, चीनसोबत कापसाचा व्यापार

    दिनांक :08-Apr-2021
|
- चीनवरील मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप पाकने फेटाळले
इस्लामाबाद, 
शिनजियांगमध्ये कामगारांकडून जबरदस्ती उत्पादित केल्या जाणार्‍या कापसाबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाकडून निषेध नोंदविण्यात आला असूनही पाकिस्तानने चीनबरोबर आपला कापूस व्यापार सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. चीनच्या शिनजियांग प्रांतात दहा लाखाहून अधिक उइगर मुस्लिमांना तुरुंगवास शिबिरात डांबण्यात आले असताना देखील पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.

int _1  H x W:  
 
पाश्चात्य देशांकडून चीन आणि शिनजियांग प्रांतावर होणारे मानवाधिकार उल्लंघनाचे सर्व आरोप आणि निर्बंध फेटाळून लावत पाकिस्तानच्या कापूस निर्यात आणि आयात संस्थांनी चीनद्वारे होणार्‍या कापूस आयातीला योग्य पाऊल म्हटले आहे. चीनमधील कापसावरील बहिष्कार पाकिस्तानच्या व्यापार्‍यांना निषेधार्ह वाटतो, असे मत पाकिस्तानी कापड निर्यात संघटनेचे अध्यक्ष मुहम्मद अहमद यांनी मांडले. पाश्चिमात्य देशांनी चीनवर केलेल्या आरोपांशी आम्हाला काही घेणे-देणे नसून, चीनसोबतचा कापड व्यापार चालूच राहणार, असेही ते म्हणाले. जागतिक व्यापार संघटना आणि संयुक्त राष्ट्रसंघ दोघांचेही आपले राजकीय हेतू आणि व्यापारी अजेंडे असल्याचे ते म्हणाले. चीनतर्फे जगातील 22 टक्के कापसाचे उत्पादन करतो. ज्यातील 84 टक्के कापूस हा शिनजियांग प्रांतात उत्पादित होतो. या प्रांतात मुस्लिमांवर सातत्याने अत्याचार, महिलांवर बलात्कार, हत्या होत असताना देखील पाकिस्तानने चीनकडूनच कापूस आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.