सानियाचा ‘टॉप्स’मध्ये समावेश

    दिनांक :08-Apr-2021
|
नवी दिल्ली, 
तब्बल चार वर्षांनंतर भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा बुधवारी केंद्र सरकारच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टॉप्स) योजनेत पुन्हा समावेश करण्यात आला आहे. ऑलिम्पिक अभियान विभागाच्या 56 व्या बैठकीत अनेक ग्रॅण्ड स्लॅम जिंकणारी 34 वर्षीय सानिया हिचा टॉम्प्समध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
spo_1  H x W: 0
 
2017 मध्ये तिची टॉम्प्समध्ये अखेरची निवड झाली होती. दुखापतीमुळे तिने काही काळ विश्रांती घेतल्यामुळे तिला टॉप्स योजनेतून बाहेर करण्यात आले होते. होय, अलीकडच्या टॉप्स यादीत सानियाची निवड करण्यात आली, असे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सूत्राने सांगितले. मातृत्वासाठी सुट्टी घेण्यापूर्वी सानियाने संरक्षित मानांकनामुळे आधीच टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध केलेली आहे. सानिया सध्या जागतिक क्रमवारीत 157 व्या क्रमांकावर आहे. महिला टेनिस संघटनेच्या नियमानुसार जे खेळाडू दुखापत किंवा गर्भधारणेमुळे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ टेनिसपासून दूर असतील, असे खेळडू विशेष मानांकनासाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे सानिया सध्या विशेष मानांकनात नवव्या स्थानावर आहे व ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर डब्ल्यूटीएने विशेष मानांकनाची तरतूद केली आहे. मातृत्वासाठी सानिया सुमारे दोन वर्षे टेनिसपासून दूर होती. पुत्रप्राप्तीनंतर तिने गतवर्षी टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. तिने युक्रेनच्या नादिया किचनोकच्या साथीने महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.