आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी मेरी कोम, लवलिनाची निवड

    दिनांक :08-Apr-2021
|
नवी दिल्ली,
आगामी 21 ते 31 मेदरम्यान येथे आयोजित आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी ऑलिम्पिक पात्र बॉक्सर मेरी कोम (51 किग्रॅ) व लवलिना बोर्गोहेनसह (69 किग्रॅ) अन्य खेळाडूंची भारतीय महिला बॉक्सिंग संघात निवड झाली आहे. संघनेतृत्वाची जबाबदारी मेरी कोमकडे सोपविण्यात आली आहे.
 
spo_1  H x W: 0
 
मेरी कोम ही सहा वेळची आशियाई पदक विजेती असून तिने पाच सुवर्णपदक जिंकलेत. 2019 सालच्या स्पर्धेतून तिने माघार घेतली होती. अलिकडेच स्पेनमध्ये आयोजित स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळविले. वर्षभरापूर्वी ऑलिम्पिकची पात्रता सिद्ध केल्यानंतर तिची ही पहिली स्पर्धा होती. संघात आसामच्या लवलिनासह सिमरनजीत कौर (60 किग्रॅ) व पूजा राणी (75 किग्रॅ) सारखे अन्य दिग्गज खेळाडूंचाही समावेश करण्यात आला असून या तिघींनी सुद्धा टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध केली आहे. सिमरनने यापूर्वी बँकॉक येथे झालेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. पूजा राणीसुद्धा सलग दुसरे आशियाई सुवर्णपदक जिंकण्यास उत्सुक आहे. 2019 साली तिने 81 किग्रॅ वजनगटातून सुवर्णपदक जिंकले होते.
 
 
गत महिन्यातच स्पेनमध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकणारी जस्मिन (57 किग्रॅ) सुद्धा आशियाई स्पर्धेत आपले नशिब अजमावणार आहे. निवड चाचणीत जस्मिनने अनुभवी मनिषाला मात दिली होती. माजी ज्युनियर विश्वविजेती साक्षी हिचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे