मोल करो तलवार का, पडी रहन दो म्यान...!

    दिनांक :08-Apr-2021
|
उन सावली 
- गिरीश प्रभुणे
 
एक अनादी काळापासूनचं सत्य. माणसाचा म्हणजे स्त्री-पुरुषांचा जन्म कुठल्या जातीत झाला त्यावरून त्याचा परिचय होतो. तो पुसता म्हटलं तरी पुसत नाही. ती म्हणजे जात. या जातीवरूनच, जन्माच्या कारणावरूनच अनेक युद्धं झालीत. अनेक राज्यं खालसा झालीत. अनेक राज्यं उदयास आली. जो बलवान झाला तो श्रेष्ठ बनला. अन्याय-अत्याचार सहन करत जाणारे कधी खूपच मोठे संत झाले. सर्वांवर प्रेम करणारे बनले, तर काही जण अनाचारी, अत्याचारी, सूड घेणारे बनले. महाभारत या दोहोंचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक काळात-युगात नव्या नव्या जाती जन्माला आल्या. आहे रे-नाही रे तयार झाले. नवे पंथ, नवा विचार उदयास आला. समता-समरसता-समाजातील भेद दूर करण्याचे लढे निर्माण झाले.
 
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याचा शोध घेतला. Who were Shudras?
शूद्र कोण होते? महाभारतातल्या आदिपर्वातील एक कथा ते उद्धृत करतात. ब्रह्मा त्याचा मुलगा मरिची. त्याचा मुलगा ‘कश्यप. हा मोठा राजा असतो. दुस-या मोठ्या राजाने- दक्ष प्रजापतीने आपल्या काही मुली कश्यप राजा ऋषीला दिल्या. आदिती-दिती, दनायू, रक्षा आणि शेवटच्या कद्रू व विनीता यातील ‘कद्रू' ही नागदेवता. हिच्यापासून नाग वंश. हिच्याशी आपल्या जातीचा संबंध जोडला. एक काळ असा होता, ज्या वेळी शोध घेताना आपण श्रेष्ठ कुळातील कसे आहोत, असा प्रयत्न असे. नंतर अलीकडे आपण आता मागास कसे आहोत, याचा शोध घेतला जातो. कबीर म्हणतात-
जात न पुछो साधू की
पुछ लिजिये ज्ञान...
  
jogi _1  H x W: 
  
आता तर प्रत्येक ग्रंथातील शब्दाशब्दांची चिरफाड करून संबंधित संतांना, त्या राजा-ऋषी-मुनी-महापुरुष यांना दोषी ठरवले जाते. समतेचा लढा कधीकधी एकदम संकुचित होऊन जातो. यमगरवाडीच्या मार्गाने जाताना अनेक वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागायचे. खरी समस्या जगण्याची. सन्मानाने जगण्याची. सारा संघर्ष त्यासाठी. हा सन्मान कर्तृत्वाने मिळवता येतो, की जातिगत जन्मजात असतो. तो खरा कर्तृत्वाशीच असायला हवा. जन्मजात उच्चपणा कोणत्याही प्रकारे नसावा. वेगवेगळ्या जाती-जमाती कशा निर्माण झाल्या असाव्यात, यावर खूप मतमतांतरे आहेत. परंतु, काम-धंदा-व्यवसाय याच्यातील परंपरा आणि त्यातील सातत्य यामुळे बापाच्या, आजोबाच्या व्यवसायाप्रमाणे मुलं-नातवंडं यांचाही तोच परंपरेने व्यवसाय आला. काही कारणाने पंचायतीने जातीबाहेर काढले, तर पुढच्या पिढ्याही जातीबाहेरच राहात. खरेतर शिक्षा ही एका पिढीपुरतीच, त्या व्यक्तीपुरतीच असायला हवी. परंतु, ती जन्मजात, पिढीजात तशीच भोगावी लागे. यावर अनेक वेळा मार्ग काढले गेले. अशा एका मार्गाचा शोध अचानक लागला.
 
 
एक दिवस अचानक दिलीप कानडेबरोबर एक जण आला. केस मोठे वाढविलेले. दाढी, भगवे कपडे, हातात मोठा चिमटा, काखेत भगवी झोळी. ‘‘आल्लख...! आदेश...! त्यांनी खणखणीत आवाजात म्हटलं. मी त्याला प्रतिसाद देत म्हटलं, ‘‘आदेश!''
‘‘काका हे नाथजोगी. नाथपंथी. नाथपंथी डवरी गोसावी या जातीची समस्या होती. यांची जात नाथपंथी म्हणून ओळखली जाते. पण, यांच्या सूचीत VJNTनाथपंथी डवरी गोसावी असा उल्लेख आहे. त्यातले स्वल्पविराम गाळले गेल्याने तीन जातींची अस्तित्वात नसलेली नवीन जात तयार झाली! त्यामुळे दाखले मिळत नाहीत. मिळाला तरी त्याचा उपयोग नाही. समोर आलेला तरुण विशी-पंचविशीतला. पण, भाषा अत्यंत उच्च- बोजड. मूळची ग्रामीण ढंगाची बोली त्यातून लपत नव्हती. ‘‘आम्ही नाथपंथी. मी नारायण बाबर. मूळचे आम्ही सातारकडचे अकलूज-बाळापूरचे. आता धा पिढ्या झाल्या. हिंगोलीला कोथळज गावी असतो.''
पुढे मी त्यांच्या गावी गेलो. पावसाळ्याच्या दिवसात कयाधू नदीच्या काठावरचं कोथळज गाव. डोंगर उतारावरची खळग्यात वसलेली यांची वस्ती. उंबराची चार-पाच झाडं. झाडाखाली देव. देवासमोर त्रिशूळ उभा. सगळी वस्ती चढउतारावरची. एकदम स्वच्छ. सर्वांनीच दाढ्या राखलेल्या. कुणी केस ऋषिमुनीसारखे वर बांधलेले, तर काहींचे मोकळे. महिला, बाया नऊवारी नेसलेल्या. पन्नास-शंभर वर्षांपूर्वीचा पोशाख सर्वांचाच होता. पुरुषांचा घरी साधाच पोषाख असे. बाहेर जाताना भगवी वस्त्रं घालीत. यांचा पिढीजात उद्योग हाच- भविष्य सांगणे. तारण-मारणाचे मंत्र टाकणे. भूत-समंधानी पछाडले असेल तर ते उतरविणे. पूजा-अर्चा करणे, घालणे. याचबरोबर मागणे. हत्ती भाड्याने घेणे, गाई-बैल भाड्याने घेऊन त्यांना बरोबर हिंडविणे. या समाजात पूर्वी शाबरी विद्या होती. याचे मंत्र असतात ‘ओम -हाऽऽम -हीऽऽम... ओम फट स्वाहा...'' अशा प्रकारचे मंत्र. अनेक विधी. हे शाक्तपंथीय असावेत. यांच्या उच्चारात फरक झाला अथवा कुणावर यांचा प्रयोग तारण-मारण करणा-यांना केला- कुणी उलटवला तर त्याचा यांच्यावर विपरीत परिणाम होतो. आता ही विद्या अवगत असणारे कुणी नाहीत. शाबर विद्या आणि शाबर भाषा, शाबर शक्ती सारंच आता अस्तास गेल्यासारखंच आहे.
 
 
नारायणचे पणजोबा शंभरीच्या वरचे. त्यांचे आजोबा नाईकांच्या बरोबर होते. नारायणचे आजोबा थकले होते. पण, आमच्या रात्रीच्या गप्पा ऐकता ऐकता ते जागचे उठून बसले. सर्व जण त्यांच्याभोवती जमले. त्यांनी हळगी-डफ मागितला. अप्पा बाबरनं तिथंच कागद पेटवून त्याच्यावर हळगी गरम करून ती आजोबांकडे दिली आणि बघता बघता राजे उमाजी नाईकांचा सारा इतिहास, शौर्य त्यांनी उभं केलं. त्यांच्या मुखातून सुरुवातीला आवाज फुटत नव्हता. पण, काही क्षणातच ते ऐन भरात आले. त्यांना पूर्ण उभं राहता येत नव्हतं, तरी ते बसल्या जागेवरूनच पोवाडा म्हणत होते. नाईकांचा हा पोवाडा त्यांच्या पणजोबांनीच लिहिला होता. नाईकांच्या हुतात्म्यानंतर लगेचच वाढणारी रात्र ही इतिहास जागवणारी ठरली. एका वेगळ्या विश्वात मला या पोवाड्यानं नेलं. पुरंदरच्या पायथ्याजवळचं ते भिवडी गाव आणि त्यातले सर्वांचे प्रेरणास्थान डोक्याला लालसर पागोटे. अंगावर फक्त कसलेलं धोतर. खांद्यावर बंदूक. कमरेला तलवार. शिवाय कमरेला खोचलेली गल्लोर आणि कपाळाला लाल गुलाल. उमाजींचं वर्णन अंगावर रोमांच उभे करीत होतं. नाथजोगींची ती वस्ती. बाहेर मुसळधार पडणारा पाऊस. दुथडी भरून वाहणारी कयाधू नदी आणि शंभरी ओलांडलेले शाहीर बाबर. त्यांची कडाडणारी हळगी...
 
 
सारंच विलक्षण. नाथपंथी- नाथ जोगींची वस्ती ही बैरागी- जोग्यांची वस्ती- नवनाथांनी भेदाभेदांवर मात करण्यासाठी खूप प्रयत्न केले. यांच्यात अनेक जातींचा भरणा झाला. त्यामुळे यांच्या ब्राह्मण-मराठे-दलित-भटके असे सर्व जातींचे मिश्रण. यांच्या सर्वात रोटीबेटी व्यवहार होतात. पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारा संजय जाधव हा नाथपंथीच. त्याची आई चिपळूणकरांकडची. मामाचं आडनाव चिपळूणकर! १८५७ च्या आधी सातारच्या छत्रपतींची गादी इंग्रजांनी खालसा केली. त्या वेळी अखेरचे छत्रपती गुप्तवेशाने खजिन्यासह बाहेर पडले. बाबासाहेब भोसले त्यांच्याबरोबरचे निवडक मावळे सैनिक सारे नाथजोगी बनून तात्या टोपेंना सामील झाले. पुढे ते बीदर-भालकीला आले. तिथे त्यांनी मठ स्थापन करून जंगलात गढी उभारली. इंग्रजांविरोधात सेना उभी केली. संन्यासी-बैरागी-नाथपंथी अशी भगवी सेना. त्यांचा उठाव यशस्वी होत गेला. अखेरीस भालकीच्या जंगलातच त्यांना पकडून फाशी देण्यात आलं. निजामाचे भालकीचे सरदार देशपांडे यांनाही फाशी देण्यात आलं. असा या जातीचा एक संक्षिप्त इतिहास. सर्वांना सामावून घेणारा नाथसंप्रदाय. त्यांचा हा रोमहर्षक लढा. त्यांच्या कथा-गीतं आजही ब-हाणपूर ते बीदर या परिसरात पाळापाळातून गायली जातात. बंकिमचंद्रांच्या ‘आनंदमठ' साठी यासारख्या संन्याशांच्या उठावाचे संदर्भ असावेत.
 
 
नाथ जोग्यांच्या त्या पाळात एक वेगळाच आनंदोत्सव साजरा झाला. म्हातारे आजोबा उठून नाईकांचा पोवाडा गाऊ लागलेत. ही बातमी वा-यासारखी पसरली. सारी वस्ती आजोबाला पाहायला जमली. आजोबा जवळजवळ दहा वर्षांनी अंथरुणातून उठले होते. त्यांनी उमाजी राजांचा इतिहासच नाही जागवला, तर नाथपंथीयांचा, नाथ जोग्यांचा, भटके-विमुक्तांचा इतिहास जागवला होता. भारताच्या अज्ञात वाटावाटांतून जाती-जमातीच्या कथा-गाथांमधून पाळापाळांतून भारताचा चालताबोलता इतिहास भरभरून वाहतोय्. अजून मेकॉलेचा, मार्क्स चा  यांना स्पर्श झालेला नाही. पाऊसकाळ संपल्यावर यांचा इथला मुक्काम हलतो. शेदोनशे पाळं. गोधड्यांची पक्की शिवण असलेली. हिंगोलीत महिना-पंधरा दिवस राहून पुढे सा-या भारतभर विखुरतात. पूर्वी घोडी असत, हत्ती असत, नंदी बैल असत. मोठीच छावणी असे. युद्धाच्या मोहिमेवर निघाल्यासारखेच निघत. अटकेपार झेंडे रोवणा-यांत हे होतेच. अशा अनेक लढाया भारताच्या स्वातंत्र्यासाठी यांनी खेळल्या... आज... दस-यानंतर हे सर्व मागायला-जगायला बाहेर पडतात.