दुकाने बंदचा आदेश आज सायंकाळपर्यंत मागे घ्या

    दिनांक :08-Apr-2021
|
- व्यापार्‍यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
कोल्हापूर,
अत्यावश्यक सेवांमध्ये नसलेली सर्व दुकाने आणि प्रतिष्ठाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यासाठी अचानक जारी करण्यात आलेला आदेश आज  गुरुवारी सायंकाळपर्यंत मागे घ्या, अन्यथा आम्ही कायदा मोडून स्वत:च दुकाने उघडू, असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
 
maha _1  H x W:
 
पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, गोंदिया, अमरावती आणि मुंबईसह राज्याच्या अन्य शहरांमधील विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी मंगळवारी सायंकाळी आभासी माध्यमातून चर्चा केली. सोमवार ते शुक्रवारी रात्री आठपासून संचारबंदी लावण्यात आली असताना, अचानक दुकाने बंदचा आदेश काढण्यात आला. हा विश्वासघात असून, सरकारने तो त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे मंडलेचा यांनी स्पष्ट केले. आठवड्यातील पहिले पाच दिवस सायंकाळपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने, सर्व व्यापारी आपापली दुकाने उघडण्यासाठी गेले असता, त्यांना या छुप्या आदेशाची माहिती देण्यात आली. आम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही. सरकारने गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपला हा तुघलकी आदेश मागे न घेतल्यास आम्ही स्वत: आपली दुकाने उघडू. त्यानंतर कोणत्याही कारवाईचा सामना करण्याचीही आमची तयारी असेल, असे त्यांनी सांगितले.
 
राज्यभरात निदर्शने
 
दरम्यान, सरकारच्या या आदेशाविरोधात व्यापार्‍यांनी राज्यात विविध ठिकाणी निदर्शने केली. काही शहरांमध्ये भाजपानेही आंदोलन केले. व्यापार्‍यांनी सविनय कायदेभंग करून, दुकानांचे शटर उघडले. कोरोनामुळे आधीच व्यवसाय संकटात आला असताना, सरकार आमच्यावरील संकट आणखी वाढवत असल्याचा आरोप त्यांनी केला. ठिकठिकाणी सरकारच्या आदेशाची होळीही करण्यात आली. तर, काही शहरांमध्ये व्यापार्‍यांनी सरकारच्या विरोधात नारेबाजी केली.
 
दोन दिवसांत तोडगा काढू : मुख्यमंत्री
 
टाळेबंदी किंवा कठोर निर्बंधाचे पाऊल कोरोनाची लाट थोपविण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. व्यापार्‍यांनीही यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये, अशीच भूमिका आहे. व्यापार्‍यांनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभिर्याने विचार करून, दोन दिवसांत तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी व प्रतिनिधींशी आभासी माध्यमातून बोलताना दिले.