नक्की कुठला “मो”?

    दिनांक :12-May-2021
|
- मधुमती वऱ्हाडपांडे
केव्हाची नीता मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसली होती. खरं तर व्हाट्सअप वर चे असंख्य ग्रुप अगदी अंगावर आल्यासारखे वाटत होते तिला. पण आवश्यक काम असल्यासारखं ती पटापट स्क्रोल करत होती. अगदी सराईतासारखं! कझिन्स च्या ग्रुपवर एका मामेबहिणीने तिचे स्वित्झर्लंड चे फोटो टाकले होते. त्याला “wow…!” वगैरे करून झालं. दुसऱ्या एका भावाने त्याच्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो टाकले होते. त्याला “Soooo cute..!” म्हणून झालं. एका मावस बहिणीच्या कवितेला “अप्रतिम..!” असा शेरा देऊन झालं. काही फॉरवर्डेड पोस्टला स्मायलींचा रिप्लाय, अंगठे, टाळ्या वगैरे देऊन झालं. नंतर सासरच्या नणंदा-भावजयांचा ग्रुप त्यात डोकावून सगळ्या पोस्ट्स ला उत्तरं देऊन आपली उपस्थिति दाखवून दिली. नंतर प्रायमरी स्कूल वाल्या मैत्रिणींचा ग्रुप, नंतर बीएससीचा ग्रुप, नंतर एमेस्सी चा ग्रुप, एक छोट्या भिशी चा ग्रुप, एक कपल भिशीचा ग्रूप, एक साहित्यिक मैत्रिणींचा ग्रुप, एक एमेस्सी लेडीज स्पेशल चा ग्रुप, एक सोसायटीच्या मेंबर्स चा ग्रुप, एक सख्ख्या भाऊ-बहिणींचा ग्रुप, एक वाचनप्रेमींचा ग्रुप, एक कविताप्रेमींचा ग्रुप, एक लेखनप्रेमींचा ग्रुप..! सगळ्यांच्या सगळ्या पोस्टला उत्तर, आवश्यक तेथे कमेंट वगैरे अगदी परमकर्तव्य असल्यासारखी दिल्यावर ती खरंच दमली.
 

sma _1  H x W:  
 
अजून फेसबुक तर उघडलंच नव्हतं! ते उघडल्यावर तर त्यात नवीन नवीन पोस्टचा पाऊसच होता जणू! कोणत्या पोस्ट वाचाव्या, कोणते फोटो बघावे, कशाला लाईक करावं, कोणाकोणाला आणि कायकाय कमेंट द्यावी ह्या महत्वाच्या प्रश्नामध्ये ती पुन्हा गढून गेली. ते दिव्य आटोपतेय इतक्यात इंस्टाग्रामचे नोटिफिकेशन्स दिसले एकाखाली एक. दुर्लक्ष करायचा कितीही प्रयत्न केला तरी बघितल्याशिवाय राहवलं नाही तिला. झालं! आता अजून अर्धा तासाची तरी निश्चिंती! सगळं होत नाही तोवर पुन्हा व्हाट्सअपवर वर धडा धडा नोटिफिकेशन्स दिसली!
 
आता बाकी तिला खरोखरच खूप गरगरल्यासारखं झालं अन नाइलाजाने तिने फोन बाजूला ठेवला. सध्या हे रोजचंच झालं होतं. तिचा स्क्रीन टाईम वाढतच चाललेला. थोडी सुद्धा उसंत नाही. एकूण एक पोस्ट निदान स्क्रोल तरी केल्याशिवाय चैन पडेनासं व्हायला झालं. प्रत्येक पोस्टला उत्तर देणे ही केवळ आपली म्हणजे आपलीच नैतिक जबाबदारी असल्यासारखं तत्परतेने सगळ्या ग्रुप वर रिप्लाय देत राहायचं. आज बाकी अगदीच राहवलं नाही म्हणून मजेत टीव्ही वर काहीतरी बघत बसलेल्या सुमित जवळ बोललीच ती हे सगळं! सुमित म्हणजेच तिचा लेक. तो आपला गालातल्या गालात हसला आईकडे बघून. त्यानेच तर आपल्या पहिल्या पगारात हा महागडा स्मार्टफोन दोन वर्षांपूर्वी तिला घेऊन दिला होता. नुसताच घेऊन दिला नाही तर व्यवस्थित तिला सगळं नीट ट्रेनिंग सुद्धा दिलं होतं. त्यामुळेच तर इतर मैत्रिणींच्या तुलनेत तिला जरा जास्तच सहजतने बरेच ऑनलाइन व्यवहारही त्यावर करता यायचे. म्हणजे त्यांच्या ग्रुपचं नाटक, सिनेमाचं वगैरे ठरलं की ऑनलाइन बुकिंगची जबाबदारी हिचीच असायची. आणि हिलाही उगाचच आपण इतरांपेक्षा स्मार्ट असल्यासारखं वाटायचं!
 
ते सगळं सुमितला माहिती होतं. तो म्हणाला, “आई, अग ह्यालाच आजच्या डिजिटल युगात फोमो (FOMO) म्हणजेच फिअर ऑफ़ मिसिंग आउट असं म्हणतात!” “अच्छा! ते काय असतं बुवा!”, तिने उत्सुकतेने विचारलं. “अगं, हा फोमो म्हणजे एक प्रकारचा सिन्ड्रोम आहे. हयात माणसं सतत ऑनलाइन असतात आणि इतर जण काय करताहेत हे समजल्याशिवाय त्यांना चैनच नाही पडत. आपण थोडावेळ जरी बघितलं नाही तर तेवढ्यावेळात काहीतरी महत्वाचे होऊन जाईल आणि आपण ते मिस करू असं त्यांना सतत वाटत राहतं. म्हणजेच ‘फिअर ऑफ़ मिसिंग आउट’!” ती नवलानं ऐकत होती. “अगबाई! खरंच आहे रे. नेहमी असं वाटतं की आपलं काहीही मिस नको व्हायला. सगळ्या पोस्ट वर आपली प्रतिक्रियाच पहिले आणि हटके असावी. एखाद्या पोस्टला काही प्रतिक्रिया दिली नाही की उगाच गिल्टी वाटतं रे!” ती काहीसं ओशाळत म्हणाली. लेक म्हणाला, “अगं आई, काही काळजी नको करूस. असं होतं खूप लोकांचं. त्यातून वेळीच बाहेर आलं म्हणजे झालं! पण तुला आणखी एक गंमत सांगू का? फोमो सारखाच आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे जोमो (JOMO)!”. “आता हे काय नवीनच?” ती उद्गारली. “अगं, जोमो म्हणजे जॉय ऑफ मिसिंग आऊट! म्हणजेच थोडक्यात सांगायचे तर, “भाड मे जाये दूनिया!, मला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही असा अविर्भाव! ह्यामध्ये आपण आहे तो क्षण अनुभवायचा. एखाद्या गोष्टीत आपण अजिबात इन्व्हॉल्व नाही याचा आनंद. दुसरे काय करतात याचा अजिबात विचार न करता स्वतः जे करतोय त्याचा आनंद अनुभवायचा.”
 
आता ती खरोखरच उत्सुकतेने लेक पुढे काय सांगतो ते ऐकायला लागली. तो उत्साहाने सांगायला लागला, “फोमो आणि जोमो सारखाच अजून एक प्रकार म्हणजे मोमो!. “मोमो? खाण्याचे मोमो कि काय?” ती उद्गारली “अग, ऐक तरी. मोमो म्हणजे “मिस्टरी ऑफ मिसिंग आऊट”! म्हणजे बघ, एखाद्यावेळी एखादा ग्रुप मेंबर अचानकच काहीही पोस्ट करणं बंद करतो. तो सगळं बघत असतो. गुप्त नजर ठेवून असतो आणि आपण मात्र तो का दिसत नाही म्हणून विनाकारण अस्वस्थ असतो आणि आपल्याला हा कुठे अचानकच गायब झालाय असं वाटत राहतं उगाचच”. “अरे, काय काय प्रकार आहेत रे हे. पण आहे बाकी इंटरेस्टिंग हं!” ती म्हणाली.
 
“आता एक शेवटचा थोडा वेगळा प्रकार सांगतो तुला. तो म्हणजे फॊजी(FOJI) म्हणजेच “फिअर ऑफ जॉइनिंग इन”! हयात तुम्ही अलिप्त राहता कारण तुम्हाला भीती वाटत असते की तुमच्या पोस्ट किंवा फोटोज कुणी लाईक करणार नाही, त्यावर कमेंट करणार नाही वगैरे वगैरे”. बापरे! अमितशी बोलता बोलता आज बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या होत्या तिला. ही सगळी माहिती लीलया देणाऱ्या आपल्या लेकाकडे ती कौतुकमिश्रित नजरेने बघत होती आणि तिला हे एवढं सगळं ज्ञान देऊन लेक आपला पुन्हा टीव्हीत गुंतला अन ती बाकी आपण नेमक्या कुठल्या “मो” त मोडतो ह्याचा अंतर्मुख होऊन विचार करायला लागली!
 
विचार करता करता तिलाच जाणवलं की सुरवातीला खुप मित्रमैत्रिणी, नातेवाईक इतर परिचित ह्यांच्याशी इतकं सहज कनेक्ट होता येतेय म्हणून जो आनंद व्ह्यायचा तो आजकाल तितकासा होत नाही. मेसेजेस ला उत्स्फूर्त प्रतिक्रिया देतादेता ते “एकदाचे आटोपून टाकायचे आवश्यक काम” होतयं अलीकडे! कुठेतरी हे ऑनलाइन जग थोडसं कृत्रिम, वरवरचं वाटत चाललयं. रोजरोज सगळे भेटत असतातच सतत ऑनलाइन म्हणून त्याचं अप्रुप वाटणही कमी झालयं. शिवाय त्या नादात आपण आपले बाकी छंदही विसरत चाललोय की काय? घरातलीही खूप कामं पेंडिंग राहतात अलीकडे. गॅलरीतली हौशीनी लावलेली झाडं पण कोमेजल्यासारखी झालीत की काय? पूर्वी सकाळचा एखादा तास तरी ह्या झाडांना ओंजारात गोंजारत किती प्रसन्नपणे जायचा आपला! आपलं “मी” पण हरवत चाललंय की काय? वेळीच सावध होऊन मोबाईलच्या नादात अती न रमता ह्या सगळ्यांचा योग्य बॅलन्स साधणं आपल्याला जमायलाच पाहिजे हा विचार करत करत नीता सोफ्यावरून उठली. तेवढ्यात परत मोबाइल मधून नोटिफिकेशन्स चे आवाज आले. पण ह्यावेळी तिकडे दुर्लक्ष करत ती थेट पुस्तकांच्या कपाटाकडे, तिची वाट बघत असलेल्या, खुप दिवसांपासून हे वाचायचंच आहे म्हणुन ऑनलाइन मागवलेल्या, पुस्तकाकडे समाधानाने वळली !
९८९०६७९५४०