लव्हिंग व्हिन्सेंट..!

    दिनांक :17-May-2021
|

- मधुमती वऱ्हाडपांडे

जगप्रसिद्ध डच कलाकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग (Vincent Van Gauge) ह्याने वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी केलेली तथाकथित आत्महत्या आणि त्याचा छडा लावण्यासाठी तिथल्या एका पोस्टमनच्या तरुण मुलाने केलेली धडपड चित्रित करणारा एक सुंदर चित्रपट म्हणजे “लव्हिंग व्हिन्सेंट”! (Loving Vincent) २०१७ मध्ये रिलीज झालेल्या ह्या चित्रपटाला अनेक प्रतिष्ठित समजल्या जाणारे अवॉर्डस् मिळालेत. या सिनेमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा एक ॲनिमेशन चित्रपट आहे. आता तुम्ही म्हणाल, “मग त्यात एवढं विशेष काय आहे?” तर विशेष हे आहे की यात जगभरातल्या २० देशांमधून जवळपास १२५ कलाकारांनी स्वतः व्हिन्सेंट व्हॅन गॉग च्या शैलीत, ऑइल पेन्टमध्ये, स्वहस्ते रंगवलेल्या तब्ब्ल ६५ हजार पेंटिंग्जचा उपयोग केलेला आहे. जवळपास पाच हजार कलाकारांमधून हे १२५ कलाकार निवडण्यात आले. ह्या प्रकल्पासाठी सलग ६ वर्षे हे सगळे कलाकार ह्या चित्रनिर्मितीत मग्न होते. खरोखरच एक प्रचंड महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प होता! ह्याची मूळ कल्पना, लेखन आणि दिग्दर्शन केलंय डोरोटा कोबीएला (Dorota Kobiela) आणि ह्यू वेंचमन (Hugh Welchman) ह्यांनी! 

व्हिन्सेंट चे विकल्या गेलेले एकमेव चित्र  (The red wineyard)

red_1  H x W: 0

 

व्हिन्सेंट व्हॅन गॉग बद्दल सांगायचं तर ह्या असामान्य प्रतिभेच्या कलाकाराने आपल्या उण्यापुऱ्या दहा वर्षांच्या चित्रकारकिर्दित दोन हजार पेक्षा जास्त पेंटिंग्ज आणि तितकेच स्केचेस काढले होते. पिसारो ह्या त्याच्या समकालीन जगप्रसिद्ध चित्रकाराने व्हिन्सेंट बद्दल म्हटले होते, “एक तर हा वेडा होईल किंवा आजवरच्या सर्व चित्रकारांना मागे टाकून फार पुढे जाईल!” आणि विलक्षण योगायोग असा की व्हिन्सेंटच्या बाबतीत हे दोन्ही अक्षरशः खरे ठरले!

वयाच्या २७ व्या वर्षी चित्रकलेला सुरुवात केलेल्या व्हिन्सेंट चे जीवन अतिशय दारिद्र्य, उपेक्षा आणि हलाखीच्या दयनीय परिस्थितीत गेले. पोटापाण्यासाठी काहीही न करता फक्त चित्रांच्या दुनियेत हरवून जाणारा हा अवलिया त्यामुळेच कुटुंबियांच्या रोषाला पात्र झाला. इतर सगळे त्याला पोसणार तरी किती दिवस? मात्र त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याला जिवाभावाची साथ मिळाली ती त्याचा धाकटा भाऊ थियो ह्याची. थियोला व्हिन्सेंटच्या क्षमतेवर, त्याच्या कल्पनांवर प्रचंड विश्वास होता. शेवटपर्यंत तो त्याला सर्वोतोपरी मानसिक, आर्थिक पाठबळ देत राहिला. व्हिन्सेंट आपल्या चित्रांमधून कष्टकरी, कशीबशी हातातोंडाची गाठ पडणाऱ्या लोकांचे जीवन चितारण्याचा प्रयत्न करायचा. आज व्हिन्सेंटच्या चित्रांची किंमत अक्षरशः कोट्यवधी रुपये आहे पण दैवदुर्विलास असा की तो जिवंत असेपर्यंत त्याचे फक्त एकच चित्र विकल्या गेले होते. ते चित्र होते “द रेड वाइनयार्ड”! आणि असं म्हणतात की हे सुद्धा आपल्या भावाला थोडीफार उभारी मिळावी म्हणून थिओने कुणालातरी पैसे देऊन विकत घेववले होते!

व्हिन्सेंटला थिओ जे पैसे पाठवायचा त्यातले बरेचसे त्याचे रंग, कागद, पेन्सिली वगैरे वगैरेंसाठी खर्च होऊन जायचे. कधी अर्धपोटी तर कधी उपाशी राहून व्हिन्सेंट तासंतास, दिवसचे दिवस भान हरपून चित्र काढीत राहायचा. ह्याचाच परिणाम शेवटी त्याची तब्येत कमालीची खालावण्यात झाला. त्याचे मानसिक आरोग्यही ढासळले. त्याला भ्रमिष्टासारखे व्हायला लागले. हे एवढे वाढले की एकदा काही किरकोळ कारणावरून त्याने चक्क आपल्या कानाची पाळी कापून काढली. आणि हद्द म्हणजे एका कागदात गुंडाळून ती आपल्या मैत्रिणीला भेट म्हणून दिली!

त्याच्या अश्या विक्षिप्त वागण्यामुळे शेवटी मनोरुग्ण म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. हे सगळं थिओ स्वतःचा संसार, जबाबदाऱ्या सांभाळून कसेबसे करत होता. व्हिन्सेंटच्या प्रेमापोटी थिओने खूप आर्थिक, मानसिक त्रास सहन केला. दवाखान्यात सुद्धा थिओने धडपड करून व्हिन्सेंटला चित्र काढण्याची परवानगी मिळवून दिली. मात्र दवाखान्याच्या त्या वातावरणात व्हिन्सेंट जास्त रमू शकला नाही आणि तो पॅरिस जवळच्या आव्र ह्या निसर्गरम्य गावामध्ये राहायला आला. तेथे त्याची व्यवस्था डॉक्टर गाशे, जे व्हिन्सेंटच्या चित्रांचे चाहते होते, त्यांच्याकडे करण्यात आली. त्या दोघांचे परस्परांशी चांगले पटायचे सुद्धा!

मात्र, एकदा काही किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीत डॉक्टर गाशे त्याला “तुझ्यामुळे तुझ्या लाडक्या भावाला, थिओला, किती त्रास होतो आहे याची तरी तुला साधी जाणीव तरी आहे का?” असा प्रश्न करतात आणि वस्तुस्थिती त्याच्या समोर उघड करतात. आणि व्हिन्सेंटला हे कटू वास्तव अतिशय मनाला लागते व त्याच तिरमिरीत झटक्याने दूरवर शेतात जाऊन स्वतःवर गोळी झाडून घेतो आणि अश्या रीतीने अखेर एक असामान्य प्रतिभेचा कलाकार या निष्ठुर जगाचा कायमचा निरोप घेतो. “लव्हिंग व्हिन्सेंट” मध्ये हा सगळा जीवनपट थोडा फ्लॅशबॅक पद्धतीने चितारला आहे. जेव्हा त्या पोस्टमनचा मुलगा व्हिन्सेंट ने थिओला लिहिलेले शेवटचे पत्र द्यायला जातो तेव्हा त्याला कळतं की, थिओसुद्धा व्हिन्सेंट नंतर सहा महिन्यातच इहलोक सोडून गेला आहे. तेव्हा तो ह्या सगळ्या प्रकरणाची आणखी माहिती मिळावी म्हणून डॉक्टर गाशेंना भेटावयास जातो. ते बाहेरगावी गेले असल्याने त्याला भेटू शकत नाहीत मग तो तेथे काही दिवस मुक्काम करतो आणि त्या दरम्यान व्हिन्सेंटच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस त्याला व्हिन्सेंटच्या जीवनातल्या अजून काही महत्त्वाच्या घटनांची माहिती मिळते. डॉ. गाशे शेवटी हे पत्र थिओच्या पत्नीकडे पोहचवतात. चित्रपटात ह्या सगळ्या घटना तुकड्या तुकड्यांनी दाखवल्या आहेत. व्हिन्सेंटच्या विशिष्ट तंत्राने काढलेल्या चित्रांमधून चित्रपट पुढे जातांना बघणे हा एक सुंदर अनुभव आहे. चित्ररसिकांनी आवर्जून बघावा असा हा एक अनोखा चित्रपट!

- ९८९०६७९५४०