एकाच वेळी डॉक्टर, पोलिस अधिकार्‍याची भूमिका

    दिनांक :02-May-2021
|
- मध्यप्रदेशचे राजेश सहाय ठरले बाधितांसाठी देवदूत
इंदूर, 
पोलिस अधिकारी म्हणून आधी आपले कर्तव्य पार पाडायचे आणि त्यानंतर डॉक्टर बनून संक्रमित पोलिस कर्मचार्‍यांवर आणि कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांवर उपचार करायचे अशी दुहेरी सेवा मध्यप्रदेशातील एक आयपीएस अधिकारी करीत आहे. ते आयपीएस असले, तरी पोलिस सेवेत येण्यापूर्वी त्यांनी एमबीबीएस व एमडीची पदवी घेतली आहे. राजेश सहाय असे या पोलिस अधिकार्‍याचे नाव असून, ते इंदूर येथे विशेष विभागाचे पोलिस अधीक्षक आहेत.
 
visesh_1  H x W
 
कोरोना काळात मागील वर्षभरात तत्पर राहून सुरक्षा नियम आणि टाळेबंदीचे पालन पोलिस सातत्याने करून घेत आहेत. तसेच, कायदा आणि सुव्यवस्थाही सांभाळत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक पोलिस कर्मचारी या विषाणूने संक्रमितही झाले. तर, काही जणांना जीवही गमवावा लागला. त्यांच्यासह पोलिसांच्या कुटुंबीयांनाही हाच धोका निर्माण झाला आहे. इंदूरमध्ये पोलिस विभागाकडून कोरोना प्रतिबंधक प्राथमिक उपचार केंद्र चालवले जाते. येथे पोलिस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लक्षणे जाणवल्यास भरती केले जाते. आतापर्यंत येथे फक्त एकच डॉक्टर कर्तव्यावर होते. मात्र, शहरात वेगाने फैलावत असलेल्या संक्रमणामुळे त्यांच्यावर मोठा ताण निर्माण झाला होता. अशा स्थितीत पोलिस अधिकारी डॉ. सहाय पुढे आले आणि त्यांनीही कोरोना संक्रमित पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपचार करण्यास सुरुवात केली. आता ते डॉक्टर म्हणून निभावत असलेले कर्तव्य त्यांच्या दिनचर्येचा भाग बनले आहे.
 
 
पोलिस सेवेत रुजू होण्यापूर्वी मी घेतलेले शिक्षण आज लोकांना उपयोगी पडत आहे, हे मी स्वत:चे भाग्य समजतो. एका बाजूला पोलिस गणवेष अंगावर चढवून देशाची सेवा करण्याची संधी, तर दुसर्‍या बाजूला डॉक्टर बनून जनसेवा करण्याचे सौभाग्यही मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीने घाबरून जाण्याचे कारण नाही. काही लक्षणे दिसत असतील, तर तत्काळ कोरोना चाचणी करावी आणि उपचार सुरू करावेत, अशी माझी सर्व पोलिस कर्मचार्‍यांना विनंती आहे. कोरोनाचे मोठे संकट सर्वत्र घोंघावत असताना डॉ. राजेश सहाय यांच्यासारख्या अधिकार्‍यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेले सेवाकार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे.