चंद्रपूर कोविड पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित

    दिनांक :02-May-2021
|
- आता खाट उपलब्धतेची माहिती मिळण्याचा दावा
- पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
चंद्रपूर, 
जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. बरेचदा गंभीर रुग्णांना खाटा उपलब्ध असूनही त्याची माहिती मिळत नाही व त्यांना वणवण फिरावे लागते. त्यामुळे आता रुग्णांना त्यांच्या प्राथमिकतेनुसार अतिदक्षता, जीवनरक्षक, प्राणवायू खाटा मिळाव्या यासाठी ‘चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या पोर्टलचे उद्घाटन 1 मे रोजी करण्यात आले.

sdgh_1  H x W:  
 
गंभीर रुग्णांना वेळेवर खाट मिळण्यासाठी या प्रणालीचा निश्चित उपयोग होणार असून, रूग्णांची याचा लाभ घ्यावा, असा दावा त्यांनी केला. या पोर्टलच्या माध्यमातून कोविड रुग्णांना चंद्रपूर शहरातील सर्व कोविड रुग्णालयात अतिदक्षता, जीवनरक्षक, प्राणवायू खाटांच्या तीन स्वतंत्र प्रतीक्षा यादी नुसार खाटा उपलब्ध होतील. यासाठी सर्वप्रथम रुग्ण जवळच्या कोविड दक्षता केंद्रात किंवा कोविड रुग्णालयात गेल्यावर तिथे रुग्णांचे प्राणवायूची पातळी व इतर बाबींची तपासणी करून त्याची नोंदणी या पोर्टलवर अपलोड केली जाईल. नोंदणीनंतर प्रत्येक रुग्णांना एक टोकन नंबर देण्यात येईल. सदर पोर्टलवर नोंदणी केलेल्या रुग्णांची खाट निहाय प्रतीक्षा यादी तयार होईल. रुग्णाची गंभीर स्थिती पाहून केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार रुग्णाला चंद्रपूर शहरातील आवश्यक सुविधा युक्त रूग्णालयात खाट उपलब्ध होईल व त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू होतील, असाही दावा करण्यात आला आहे.
 
 
सोमवारपासून शहरातील सर्व कोविड रूग्णालयांना रुग्णांना परस्पर दाखल करून न घेता या प्रणालीवर नोंदणी केलेल्या प्रतिक्षा यादीतीलच रूग्णांना भरती करून घेतील. आभासी प्रणालीमुळे जुन्या रूग्णाला सुटी मिळाल्यावर रूग्णालयामध्ये रिक्त होणार्‍या खाटांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष व कोविड दक्षता केंद्राला लगेच उपलब्ध होईल. रिक्त झालेल्या खाटा प्रतिक्षा यादीतील रूग्णाचे नावे लगेचच उपलब्ध होईल.
 
 
खाट मिळाल्याची माहिती संबंधित रुग्णालय तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाद्वारे रुग्णाला दूरध्वनीद्वारे देण्यात येईल. या प्रणालीच्या माध्यमातून खाट उपलब्ध करून दिलेल्या रूग्णालयामध्ये रुग्ण थेट जाऊन उपचार घेतील. यामुळे प्रतीक्षा यादीतील गरजू रुग्णाला तात्काळ खाट उपलब्ध होईल. कोवीड रूग्णांसाठी ‘ऑनलाईन बेड अलॉटमेंट’ प्रणाली चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम कार्यान्वित करण्यात येत आहे. याचा थेट लाभ होणार असून, रूग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
 
येथे होणार नोंदणी
वन अकादमी वसतिगृह तसेच चंद्रपूरचे सर्व कोविड रूग्णालय, ब्रम्हपुरी-कोविड दक्षता केंद्र, तंत्रनिकेतन महाविद्यालय, चिमूर-मुलींचे वस्तीगृह; कोरपना- मुलींचे वस्तीगृह, भाऊराव पाटील चटप आश्रमशाळा, आदिलाबाद रोड; सावली-राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय वस्तीगृह; सिंदेवाही- मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह, पथारी रोड, राजुरा-समाजकल्याण मुलांचे वस्तीगृह, इंदिरा नगर; गडचांदूर- होली फ्लेम स्कुल; भद्रावती-जैन मंदिर; मुल-उपजिल्हा रूग्णालय वसाहत, वरोरा-आदिवासी मुलींचे वस्तीगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृह, आदिवासी मुलांचे वस्तीगृह; बल्लारपूर-सैनिक शाळा बल्लारपूर, समाजकल्याण वस्तीगृह; नागभिड-जी.डब्ल्यु. कॉलेज; पोंभूर्णा-ग्रामीण रूग्णालय या कोविड केअर सेंटर व कोविड हॉस्पीटलमधून रूग्णांची नोंदणी करण्यात येईल.