आ. केचे व्हेंटिलेटर देऊन तर पालकमंत्री गेले हात हलवत!

    दिनांक :02-May-2021
|
कारंजा (घा.),
महाराष्ट्र दिनी येथील ग्रामीण रुग्णालयाला दुपारी आ. दादाराव केचे तर सायंकाळी पालकमंत्री सुनील केदार व माजी आ. अमर काळे यांनी स्थानिक कार्यकर्त्यासह भेट देऊन रुग्णालयाचा आढावा घेतला. आ. दादाराव केचे व्हेंटीलेटर भेट देऊन गेले तर पालकमंत्री सुनील केदार व माजी आ. काळे रुग्णालयाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून निघून गेले. त्यामुळे पालकमंत्री गेले हात हलवत अशी प्रतिक्रिया तालुक्यात उमटत आहे.
 
fdhdg_1  H x W:
 
पालकमंत्री केदार यांना मागील वर्षापासून आरोग्य विषयक समस्यांचा पाठपुरावा करणार्‍या नागरी समस्या संघर्ष समितीतर्फे लोकप्रतिनिधी व प्रशासनाकड पाठपुरावा केलेल्या माहितीची कठोर स्मरणपत्र नावाची फाईल सुपूर्द करण्यात आली. यावेळी पाणी समस्या सुद्धा मांडण्यात आली. विद्यमान आ. दादाराव केचे यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून प्राप्त तीन मिनी व्हॅन्टिलेटर येथील ग्रामीण रुग्णालयाला हस्तांतरित केले. आ. केचे यांची भेट रुग्णालयाला काहीतरी मिळवून देणारी ठरल्याची चर्चा सुरू आहे. सोबत लवकरच प्राणवायूसह 50 खाटाचे कोरोना सेंटर सुरु करण्यासंबंधी त्यांनी आश्वस्त केले.
 
 
कारंजा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शहरासह ग्रामीण भागामध्ये रुग्ण आहेत. त्या सर्व रुग्णांचा उपचार इथेच व्हावा याकरिता प्रयत्नशील असल्याचे आ. केचे यांनी सांगितले. राजकारण बाजूला ठेवून शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रभाकर वंजारी, डॉ. सचिन खोंड यांच्यासह भाजपा वर्धा जिल्हा उपाध्यक्ष शिरीष भांगे, भाजपा तालुका अध्यक्ष मुकुंद बारंगे, जिप सदस्य रेवता धोटे, पंस उपसभापती जगदीश डोळे, शहर अध्यक्ष दिलीप जसूतकर, नगरपंचायत सदस्य संजय कदम, शेख निसार, किशोर भांगे, माजी सभापती मंगेश खवशी यांची उपस्थिती होती.
 
 
रुग्णालयातील कोरोनाविषयक काहीतरी समस्या दुर करण्याचा प्रयत्न पालकमंत्री केदार करतील अशी अपेक्षा जनतेची होती. परंतु, वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा करून रुग्णालयातील आढाव्याची माहिती घेत कोणतेही आश्वासन न देता निघून गेल्याने भ्रमनिरास झाला. यावेळी पंचायत समिती सभापती चंद्रशेखर आत्राम, पंचायत समिती सदस्य टिकाराम घागरे, नगरपंचायतचे माजी उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर, माजी सदस्य प्रेम महिले, जयसिंग घाडगे, संजय मस्की आदी उपस्थित होते.