सामान्य रूग्णालयातील कंत्राटी कर्मचार्‍याचा मृत्यू

    दिनांक :02-May-2021
|
- थकित पगार, नोकरीसाठी नातेवाईकांचा ठिय्या
- काही काळ तणाव
चंद्रपूर, 
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रूग्णालयातील विद्युत विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या एका कर्मचार्‍याचा कोरोना आजाराने शनिवारी रात्री मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. वडिलाच्या जागी मुलीला कंत्राटी नोकरी व थकित दहा महिन्याचा पगार तात्काळ देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी नातेवाईकांनी रविवारी सामान्य रूग्णालय परिसरात ठिय्या मांडला. त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
 
dfh_1  H x W: 0
 
महानगरातील घुटकाळा वॉर्ड परिसरातील बिनबा गेट जवळ वास्तव्य करणारे सुदेश सुखदेव ठेंभरे हे मागील काही वर्षापासून सामान्य रूग्णालयात विद्युत विभागात कंत्राटी पद्धतीने नोकरीवर होते. त्यांना मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यातून ते बरे झाले. पुन्हा त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. दोन दिवसांपूर्वी त्यांना सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर कोविड उपचार केंद्रात उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी त्यांची प्रकृती आणखी खालावली. रूग्णालयातील कार्यरत डॉक्टरांना उपचार करा, अशी विनवणी केली. त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप मृतकाच्या मुलीने केला आहे. आता मुलीला कंत्राटी नोकरी द्यावी, मागील दहा महिन्याचा पगार थकित आहे. तो तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी मृताच्या अन्य नातेवाईकांनी केली आहे. वृत्तलिहिस्तोवर हा तणाव कायम होता.