नव्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त

    दिनांक :02-May-2021
|
-नव्याने बाधित ५००७
-कोरोनामुक्त ६३७६
-एकूण मृत्यू ११२
 
नागपूर, 
नागपूर जिल्ह्यात मागील २४ तासात ५००७ बाधितांची भर पडली असली तरी त्याहून जास्त म्हणजे ६३७६ कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तीचे ८०.५१ टक्के प्रमाण मनोबल उंचावणारेच ठरले आहे. कोरोनामुक्तांची संख्या सव्वातीन लाखांवर पोहोचली आहे. एकीककडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती असतानाच आज नव्या बाधितांपेक्षा १३६९ जास्त बरे झाले. ६३७६ कोरोनामुक्तांमध्ये ग्रामीणमधील १७८० व शहरातील ४५९६ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत ३ लाख ३७ हजार ६४४ कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात गृहविलगिकरणातील १८५३११ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्तीचे आजचे प्रमाण ८०.५१ टक्के आहे.
 

dsgs_1  H x W:  
 
मागील २४ तासात नागपूर जिल्ह्यात एकूण १८६२९ रुग्णांच्या चाचण्या होऊन त्यात १३१२२ म्हणजे ७०.४३ टक्के रुग्णांचे नमुने नकारात्मक ठरणे उत्साह वाढवणारे आहे. फक्त ५५०७ रुग्णांचे नमुने सकारात्मक आले. आरटीपीसीआर पद्धतीने नागपूर जिल्ह्यात १५२०४ तसेच अँटिजेन पद्धतीने ३४२५, असे एकूण १८६२९ नमुन्यांची चाचणी झाली. त्यात सर्वाधिक खाजगी प्रयोगशाळांत ५९६३, अँटिजेन पद्धतीने २६५६, रातुम नागपूर विद्यापीठ प्रयोगशाळेत ४९७, नीरी प्रयोगशाळेत १४४, मेयो प्रयोगशाळेत १९२२, मेडिकल प्रयोगशाळेत ११६४, एम्स प्रयोगशाळेत ७७६, असे एकूण १३१२२ रुग्णांचे नमुने नकारात्मक आले.
 
 
नागपूर जिल्ह्यातील रुग्णालये व कोविड काळजी केंद्रात १३८९७ रुग्ण दाखल असून दाखल होण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या ५००७ बाधितांचा यात समावेश आहे. ६०२३० गृहविलगित आहेत. नागपूर जिल्ह्यात ग्रामीणमध्ये ३६, शहरात ६२ तसेच जिल्ह्याबाहेरील १४, अशा ११२ बाधितांचा मृत्यू झाला. एकूण ७५९९ बाधितांच्या मृत्यूची संख्या झाली.
 
 
श्वास घेण्यास त्रास होऊ लागला की मग रुग्ण रुग्णालयात धाव घेतात. हा उशीर तसेच बाधितांची संख्या आणि उपलब्ध रुग्णशय्यांची संख्या यांचे व्यस्त प्रमाण हे वाढत्या मृत्यू संख्येस कारणीभूत ठरत आहे. मुखाच्छादन, स्वच्छता, भौतिक दूरता या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कोरोनापासून बचाव करायचा असेल तर सावधगिरी हाच उत्तम उपाय आहे.