कोरोनामुळे जगभरात झालेल्या पत्रकारांच्या मृत्यूंचा आराखडा

    दिनांक :02-May-2021
|
नवी दिल्ली,
सद्यस्थितीत जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या काळात वृत्तांकन करणाऱ्या अनेक पत्रकारांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील काहींचे म़ृत्यू झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूमुळे पत्रकारांच्या मृत्यूचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या यादीत जगात भारत तिसऱ्या स्थानावर आहे. मागील वर्षभरात भारतात 107 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या दोन आठवड्यांत जवळपास 45 भारतीय पत्रकारांनी आपले प्राण गमावले आहेत. पत्रकारांचे सर्वाधिक मृत्यू ब्राझीलमध्ये झाले आहेत.

gdfjg _1  H x W
 
जिनिव्हात पत्रकारांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या 'द प्रेस एब्लेम कँपेन'च्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. 26 एप्रिलपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाच्या संसर्गामुळे किमान 107 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. तर, ब्राझीलमध्ये 181 आणि पेरूमध्ये 140 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. 'द प्रेस एब्लेम कँपेन' ने जाहीर केलेल्या आकडेवारीनंतर भारतात आणखी सात ते आठ पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांची संख्या 115च्या आसपास झाली असल्याचे 'द वायर' या वृत्त संकेतस्थळाने म्हटले आहे.
जगातील इतर देशांपैकी मेक्सिकोमध्ये 106, इटलीमध्ये 52, बांगलादेशमध्ये 51, कोलंबियात 49, अमेरिकेत 47, इक्वाडोअरमध्ये 46, ब्रिटनमध्ये 28, डोमिनिक रिपब्लिक 27, पाकिस्तानमध्ये 25, तुर्कीमध्ये 24, इराण आणि रशियात प्रत्येकी 21, अर्जेंटिना आणि व्हेनेझुएलामध्ये प्रत्येकी 17, पनामाध्ये 16, स्पेनमध्ये 15, युक्रेमध्ये 14 पत्रकारांची कोरोनामुळे मृत्यू झाला.
'द प्रेस एब्लेम कँपेन' नुसार, मार्च 2020 पासून आतापर्यंत 76 देशांमध्ये कोरोनाबाधित झाल्यानंतर 1,184 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. 'द प्रेस एब्लेम कँपेन'च्या लेखिका नवा ठाकुरिया यांनी सांगितले की, हाती आलेल्या आकडेवारीपेक्षा मृत्यू झालेल्या पत्रकारांची संख्या अधिक असू शकते. काही माध्यम समूहांकडून बाधित कर्मचाऱ्यांची माहिती आली नाही. 'द प्रेस एब्लेम कँपेन'ने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांची माहिती तयार केली आहे. यामध्ये पत्रकारांचे नाव, वय आणि अन्य माहीती आहे.