बुट्टीमार वैद्यकीय अधिकार्‍यांचा लगेच बंदोबस्त करा

    दिनांक :02-May-2021
|
 - पालकमंत्री सुनील केदार
वर्धा, 
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा वादातील ठरत आहे. त्यासाठी मनुष्यबळाची कमतरता कारणीभूत ठरत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी बुट्टी मारत असतील तर त्याची आज 1 रोजी रात्रीपर्यंत चौकशी करून बंदोबस्त करतो, अशी माहिती पालकमंत्री सुनील केदार यांनी 1 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
 
gfcvnm _1  H x
 
ना. केदार पुढे म्हणाले की, उत्तम गलवा येथील प्राणवायू वापरून जम्बो कोविड केंद्र तयार करण्याची कारवाई सुरू आहे. तांत्रिकदृष्ट्या ते पूर्ण असावे यासाठी जेवढा कालावधी अपेक्षित आहे तेवढा द्यावा लागेल. आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रस्तावास मान्यता दिली असून प्रस्ताव कॅबिनेट पुढे असल्याचे त्यांनी सांगितले. जम्बो कोविड सेंटर साठी तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी कालावधी लागेल, असे ते म्हणाले. तालुक्याच्या ठिकाणी बेड वाढवण्याची मागणी होत आहे. सामान्य माणसाला आरोग्य सुविधा पुरविणे ही प्राथमिकता आहेच. पण प्राणवायूची अडचण आहे. प्राणवायूची उपलब्धता पाहून खाटा वाढवण्याचा निर्णय घेऊ तसेच पूर्ण सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय नवीन सेंटर उभे करणार नाही असेही ते म्हणाले.
 
 
राज्यशासनाने खरेदी केलेल्या 5 हजार लसीचा पुरवठा जिल्ह्याला झाला आहे. त्यातून उद्यापासून जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होईल. जिल्ह्यात वर्धा येथे गांधी लेप्रसी फाउंडेशन, ग्रामीण रुग्णालय पुलगाव, ग्रामीण रुग्णालय कारंजा, टाका ग्राउंड उप प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगणघाट आणि उपजिल्हा रुग्णालय आर्वी असे 5 केंद्र सुरू करण्यात आले आहेत. उद्या दुपारी दोन नंतर लसीकरण सुरू होईल असे त्यांनी सांगितले.
 
 
जिल्ह्यात 45 वर्षापुढील 40 टक्के लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा डबघाईस आलेली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक कोणालाच भ्रमणध्वनीवरून प्रतिसाद देत नाहीत असा प्रश्न विचारला असता मनुष्यबळाची कमतरता असून कंत्राटी डॉक्टर मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर कंत्राटी डॉक्टर का मिळत नाहीत असा प्रश्न पालकमंत्री केदार यांना विचारला असता त्यांनी नकारात्मकता दर्शविली असता जिल्हा सामान्य रुग्णालयातील गलेलठ्ठ वेतन घेणारे बुट्ट्या मारतात आणि 15-18 हजार वेतन घेणारे कंत्राटी डॉक्टरवर रूबाब झाडत असल्याने कंत्राटी डॉक्टर मिळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनात आणून दिले असता आपण आजच या गोष्टींचा बंदोबस्त करतो असे सांगितले..