समरसतेचा परिस- बाळासाहेब देवरस

    दिनांक :27-May-2021
Total Views |
उनसावली
 
- गिरीश प्रभुणे
डॉक्टरांना अगदी जवळून समजून घेणं. डॉक्टरांच्या विचारांच्या शब्दांमधील सुप्त विचारातील ऊर्जा स्वतःत सामावून घेत, आपले विचार आपली कृती- माती आणि वृक्षाच्या मुळ्या जशा एकमेकांत मिसळून जातात. मातीतल्या रसाचे दर्शन आपल्याला सृष्टिचक्रातील विविध रंगांतून, विविध आकारांतून, विविध रूपांतून निरंतर होत असते. फुलातून गंध जसा वेगळा काढता येत नाही, तरीही तो सर्वांना मोहवून टाकतो. वेढून टाकतो. फुलवतो... भुलवतो... या भुलविण्यातून काय दिसते? एक समर्पणाची सर्वव्यापी दृष्टी... या सृष्टिचक्रात सर्वव्यापी समर्पण दिसते. प्रलय... लय... निलय... विलय हे समर्पण... सृजनशीलता घडविते. नवनिर्मिती करते. अवघड, कठीण, अप्राप्य, असाध्य, सर्वांवर सहजतेने मात करते. ती समर्पिताच अवघड, कठीण, अप्राप्य, असाध्य बनून समर्पित होते. असं अवघड रूप संघटनेला देणं...! किती अवघड...! आणि तेही हिंदू समाजाला...! जो अनंत समस्यांनी ग्रासून गेला आहे. स्वतःच्या अस्तित्वाचंच त्याला विस्मरण झालंय. जो तो फक्त आणि फक्त व्यक्तिगत स्वार्थात गुरफटलाय... किंवा हिंदूच... हिंदूचे मनोबल... धैर्य... खच्चीकरण करण्यातच धन्यता मानतो.
 

rss _1  H x W:  
 
अशा विविध भाषी, विविध जाती-जमातीत विखुरलेला... जगातले सर्व वर्ण धारण करणारा असा हिंदू, त्याच्या मनाच्या गाभ्याला हाक देऊन गर्भधारण करावा, तसा अगदी आतून... गर्भाशयातूनच... हे गर्भगृह, गर्भालय... गर्भ... आशय... अति... अनादी प्राचीन... संगच्छध्वं- संवदध्वं... चा घोष करीत विश्वाचे आर्त मनात प्रसवणारे असंख्य ज्ञानसूर्य राष्ट्ररसात एकरूप करणारे संघ रसायन... संघ स्थापनेपासून अन्तरहृदयात जोपासणारे मधुकर दत्तात्रेय देवरस... गुरुजी एकदा म्हणाले होते... ‘डॉक्टरांना ज्यांनी पाहिलं नाही; अनुभवलं नाही, त्यांनी बाळासाहेबांकडे पहावं. डॉक्टरांचं रूपच आपल्याला दिसेल.' असे सूर्याची छाया असलेले बाळासाहेब...! पहिले प्रचारक... वंग भूमीतले... डॉक्टरही प्रथम वंगभूमीतच गेले होते. या गौडभूमीतून स्वामी विवेकानंदांना नित्य, सनातन, अनादी, विश्वात्मक भारतीयत्वाचा साक्षात्कार झाला.
 
 
 
 
 
बाळासाहेबांनी जबाबदारी तर खूप पूर्वीच स्वीकारली होती. गुरुजींच्या सर्वव्यापी, प्रभावी, तरीही अलिप्त नेतृत्वाच्या बरोबरीने अगदी निकटतेने झाकोळून न जाता झळाळून... त्याच संचितावर मातीत पाय घट्ट रोवून आकाशी विहरण्याची प्रेरणा देणारे विलक्षण प्रभावी संघ विचार विश्व निर्माण करणारे बाळासाहेब! स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते सत्तरपर्यंतचा काळ हा संघ कसोटीचा काळ होता. महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप, ब्राह्मणवादाचा आरोप, मनुवादी संघटना, चातुर्वण्र्यावादी संघटन, आरक्षणविरोधी विचार, स्वातंत्र्य चळवळीपासून अलिप्त अशा आरोपांनी सर्वत्र लेखन, भाषण, सभासंमेलनातून एकच नारा असायचा संघ विरोध. हिंदुत्व विरोध. अशा वातावरणात संघसूत्र बाळासाहेबांकडे आली. गुरुजींनी अत्यंत कठीण काळात हिंदुत्वाचं भावविश्व फुलवले.
 
राष्ट्रवादाला देशाच्या अजेंड्यावर आणलं. कडव्या विरोधातही विविध पैलूंमध्ये काम सुरू झालं. ध्येय समर्पित, राष्ट्र समर्पित स्वयंसेवकांची एक मोठी फळी देशाच्या कानाकोप-यात शांतपणे, निरलसपणे, कोणत्याही विरोधाला न डगमगता विविध क्षेत्रांत कार्यरत झाली होती. संघावरच्या आरोपांना आपल्या कामानेच उत्तर दिले जाई. अशा परिस्थितीत गुरुजींचं निधन झालं आणि आजवर सरकार्यवाहपदी असणारे बाळासाहेब, जे संघटनात्मक बांधणीत याच काळात संघ विस्ताराचं काम पाहात होते. संघसूत्र हातात आल्यानंतर अनेक परंपरांना त्यांनी नवा अर्थप्राप्त करून दिला. अनेक संकल्पनांचा विस्तार केला. संघ स्वयंसेवकांच्या मनावरचं आरोपांमुळे आलेलं दडपण, चातुर्वर्णाचं, वर्ण व्यवस्थेचं, मनुस्मृतीचं ओझं उतरलं. बाळासाहेबांनी अत्यंत स्पष्ट शब्दात विषमतेचा, वर्णाश्रमाचा, उच्चनीच भेदाचा, अस्पृश्यतेचा धिक्कार केला. निषेध केला आणि अस्पृश्यता जर वाईट नसेल तर जगात काहीच वाईट नाही, असा स्पष्ट उच्चार करीत त्यांनी ‘अस्पृश्यता कोणत्याही परिस्थितीत गेलीच पाहिजे. तो हिंदू समाजावरचा कलंक आहे,' असं नि:संदिग्धपणे, निर्धारपूर्वक मांडलं. या हुंकारानंतर समाजातल्या विचारवंतांची जी संघाविरुद्ध सततची कोल्हेकुई चालायची ती बंद झाली. बाळासाहेबांच्या वसंत व्याख्यानमालेतील सामाजिक समतेच्या स्पष्ट उच्चारानंतर एक नवा निर्धार स्वयंसेवकांच्या वागण्या-बोलण्यातून व्यक्त होऊ लागला. संघकार्याच्या शाखेच्या प्रत्येक कृतीला समता, समरसतेचा अर्थ, जो त्यात अंतर्भूत होताच, प्राप्त झाला. हिंदुत्व याचाच अर्थ समता-समरसता.
 
बाळासाहेबांच्या सरसंघचालक म्हणून पहिल्या देशव्यापी प्रवासाने भारतातील सामाजिक जीवन ढवळून निघालं. इतकं वर्ष मुरलेलं संघ स्वयंसेवकांचं ‘लोणचं' अधिक ‘चविष्ट' जोमानं कार्यरत झालं. बाळासाहेबांचा- म्हैसाळ प्रकल्पाला भेट- हा प्रवास संघ स्वयंसेवकांना एक वेगळा सामाजिक संदेश देणारा ठरला. म्हैसाळ प्रकल्प हा सहकारी शेतीतला दलित विकासाचा, उत्थानाचा एक अभिनव सामाजिक प्रकल्प होता. महाराष्ट्रात त्याचा खूपच बोलबाला होता. देवल तामिळनाडूत प्रचारक होते. ५७-५८ ला ते अचानक माघारी आले आणि आपल्या गावातील समस्याग्रस्त ‘महार', दलित, देवदासी, गोपाळ, रामोशी अशांमध्ये काम करू लागले. या प्रकल्पांवर पु. ल. देशपांडे असे अनेक साहित्यिक, विचारवंत जा-ये करीत होते. एका आघाडीच्या वृत्तपत्रानेही ‘म्हैसाळमार्ग' असा अग्रलेख लिहून गौरव केलेल्या प्रकल्पावर बाळासाहेबांचा प्रवास. त्याचबरोबर बंगलोर येथील ख्रिश्चन, मुस्लिम विचारवंतांबरोबर झालेली दीर्घ बैठक ही संघाविषयी, हिंदुत्वाविषयी, राष्ट्रवादाविषयीची वैचारिक खोली वाढविणारी आणि भारतीय उपखंडाचा व्यापक विचार करणारी अखंड भारताच्या सामाजिक वास्तवाचा विचार करणारी ठरावी.
 
याच काळात देशभरात अनेक वैचारिक आंदोलने झाली. आरक्षणविरोधी आंदोलने, महाराष्ट्रातील नामांतर आंदोलन, ‘रिडल्स'चं आंदोलन, बांगलादेशींच्या घुसखोरीविरोधातील आसामचं ‘आसू'चं आंदोलन आणि मुख्यत्वेकरून जयप्रकाशजींचा ‘समग्रक्रांती' नारा, पाठोपाठची ‘आणिबाणी' या सर्वांनी भारतीय ऐक्याला, एकात्मतेला सुरुंग लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. ‘आणिबाणी' ही तर लोकशाही, स्वातंत्र्य, समता यांचाच गळा घोटणारी ठरली. अशा स्थितीत बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा कस लागला. भारताच्या दुस-या स्वातंत्र्य लढ्यात संघ पूर्णतः उतरला. सत्याग्रह, आंदोलने याचबरोबर सामाजिक विषमतेविरुद्धचा लढा. यात स्वयंसेवक हिरिरीने भाग घेऊ लागले. हिंदू समाजाच्या बळकटीच्या सर्वंकष लढ्याला सुरुवात झाली.
 
एकीकडे संघटनात्मक पातळीवर संघ शाखांचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. वैचारिक क्षेत्रात हिंदुत्वाला मुरड न घालता समन्वयावर भर देऊन व्यापक पायावर हिंदुत्व उभे राहिले. सेवाकार्य करण्यात अनेक स्वयंसेवक पुढे येऊ लागले. बाळासाहेबांना व्यक्तिगत एक लाखाचा मिळालेला पुरस्कार त्यांनी म्हैसाळला बहाल केला. बोलणं, वागणं, कृती या शब्दात एक वेगळी शुचिता-वैचारिक समृद्धी बाळासाहेबांच्या विचारदर्शनानं येऊ लागली. सामाजिक समरसता मंचाची स्थापना, भटके विमुक्त विकास परिषदेची स्थापना, राष्ट्रीय शीख संगत, राष्ट्रीय मुस्लिम मंच या प्रकारच्या अनेक संघटनांच्या कार्यामुळे मूलगामी चिंतनाला चालना मिळाली. रामजन्मभूमी मुक्तीच्या आंदोलनाचा पहिला उच्चार बाळासाहेबांनीच केला. बाळासाहेबांनी संघाच्या सांस्कृतिक भावविश्वाच्या अंतरंगाला सामाजिक समरसतेची व्यापक बैठक दिल्यामुळे हिंदुत्व अधिक खोलवर रुजू लागलं. समाजाच्या अस्पर्श स्तरापर्यंत पोहोचणं शक्य झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराजांपासून सर्वच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीकडे सकारात्मकतेने पाहण्याचा एक नवा हिंदुत्ववादी दृष्टिकोन समोर आला.
 
बाळासाहेबांचा स्वभाव तसा शांत, संयमी. विचार अत्यंत परखड, स्पष्ट मांडणी सरळ, गुंतागुंत सोडविणारी. सकारात्मक, आश्वासक. त्यांच्या बोलण्यावर कधीच पुन:पुन्हा खुलासे करावे लागले नाहीत. स्वयंसेवक पूर्वी व्यक्त होत नसत. लेखन करीत नसत, वादविवादात सहभागी होत नसत. संघशाखा मोकळ्या मैदानात भरूनही ‘गुप्त' तेचा आरोप होत असे. त्याऐवजी संघ स्वयंसेवक सर्व विषयांत काम करू लागले, लिहू लागले, बोलू लागले. चिंतनमुक्त चिंतन बाळासाहेबांच्या काळात सुरू झालं. शोध-प्रतिशोधाची भावना कमी होऊन व्यापक हिताचा विचार आला. याचं उत्तम उदाहरण आणिबाणीनंतर, झालं गेलं विसरून पुन्हा कामाला लागा, हा संदेश त्यांनी दिला. संघाच्या इतिहासात डॉक्टर-गुरुजींनंतर बाळासाहेबांनी राष्ट्रहिताचा विचार करणारी समर्पित कार्यकत्र्यांची मांदियाळी उभी केली. हिंदुत्वाच्या सामाजिक क्रांतीचे उद्गाते पू. बाळासाहेबांच्याच शब्दात सांगायचं झालं तर ‘संघाला देवदुर्लभ कार्यकर्ते' मिळाले, तर संघाला समरसतेचा देवदुर्लभ ‘देवरस'  मिळाला.