गांधी विचार सरणी आणि चेतना विकास संस्थेच्या सुमन बंग यांचे निधन

    दिनांक :03-May-2021
|
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
ज्येष्ठ गांधीवादी, भूदान चळवळीसह संपूर्ण क्रांती आंदोलनात सक्रिय सहभागी तसेच गांधी विचारांवर महिलांकरिता चालविण्यात येणार्‍या चेतना विकास संस्थेच्या सर्वेसर्वा सुमन ठाकुरदास बंग यांचे आज 3 रोजी कस्तुरबा रुग्णालयात निधन झाले. त्या 96 वर्षाच्या होत्या. सुमनताईंनी वर्धेशेजारी असलेल्या महाकाळ येथे साधना सधन संस्थेच्या माध्यमातून स्वावलंबी सामुहिक प्रयोग सुरू केला. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीला सुरूवात झाली. बंग दाम्पत्याने या चळवळीत सहभाग घेतला. आश्रम जीवन पद्धतीचे संस्कार अशोक व डॉ अभय बंग या मुलांना दिले. 1970 मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात सहभागी झाल्या. त्यांनी दोन वेळा तुरूंगवासही भोगला.
 

m_1  H x W: 0 x 
 
ग्रामीण भागातील महिलांसाठी चेतना विकास मैलाचा दगड ठरला. जवळपास 125 गावात काम सुरू आहे. गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन सुमनताई यांनी संस्थेच्या माध्यमातून आपले कार्य अखंड सुरू ठेवले होते. स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी कार्यरत असतानाच शाश्वत शेती, खादी व शिक्षण प्रणालीत प्रयोगशीलता, निसर्गोपचार, कांचनमुक्ती, सामूहिक जीवन, युवकयुवतींसाठी लैंगिक शिक्षण, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, पती-पत्नी संमेलन, सासू-सून संमेलन असे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबविले. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबात 1925 साली जन्मलेल्या सुमनताईंनी विद्यार्थीदशेत सेवादलाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. जगण्यात साधेपणा आणि विचारांमध्ये वैज्ञानिकता स्वीकारलेल्या सुमनताई बंग यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले.