फायझरकडून 70 लाख डॉलर्सची कोरोनाविरोधी औषधे

    दिनांक :03-May-2021
|
न्यू यॉर्क,
अमेरिका, युरोप आणि आशियातील वितरण केंद्रांमधून 70 लाख डॉलर्सची कोरोनाविरोधी औषधे भारतात पाठवली जात आहेत, अशी माहिती फायझर कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला यांनी आज सोमवारी दिली.भारतात कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर असून, त्याची आम्हाला चिंता आहे. या कठीण परिस्थितीत आम्ही भारतासोबत आहोत, असे त्यांनी भारतातील फायझरच्या कर्मचार्‍यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे. एक भागीदार म्हणून भारतातील कोरोनाविरोधी लढ्यात सहकार्य करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. कंपनीच्या इतिहासातील सर्वांत मोठी मानवी मदत भारतात पाठवण्यासाठी आम्ही काम करीत आहोत, असे त्यांनी या मेलमध्ये म्हटले आहे.

intre_1  H x W: 
 
अमेरिका, युरोप आणि आशियातील वितरण केंद्रांवरून ही कोरोनाविरोधी औषधे भारतात लवकरात लवकर पोहोचतील याची काळजी घेतली जात आहे. भारतातील प्रत्येक सार्वजनिक रुग्णालय आणि प्रत्येक बाधितांना फायझरची कोरोनाविरोधी औषधे निःशुल्क उपलब्ध व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे बोर्ला यांनी मेलमध्ये म्हटले आहे. 70 लाख डॉलर्सची ही औषधे तातडीने उपलब्ध करून दिली जातील. सर्वाधिक गरज असलेल्या भागात ही औषधे वितरीत करण्यासाठी आम्ही भारत सरकार आणि आमच्या भागीदार स्वयंसेवी संघटनांच्या संपर्कात आहोत, असेही कंपनीने सांगितले.