कोव्हॅक्सिन अभावी 7 लसीकरण केंद्र बंद

    दिनांक :03-May-2021
|
वर्धा, 
जिल्ह्यात तिसर्‍या टप्यात लसीकरण सुरू झाले आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद ही मिळत असताना शहरासह जिल्ह्यातील लसीकरण केद्रांवर नागरिकांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अशात शहरातील 4 तर खाजगी 3 असे 7 लसीकरण केंद्र बंद झाले आहे.
 
dhgf_1  H x W:
 
कोराना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांमध्ये जनजागृती करत लसीकरणाची मोहीम हाती घेतली. शहरासह ग्रामीण भागात ही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. दिवसाकाठी शे-दोनशे होणारे लसीकरण तीन हजारांपर्यंत पोहोचले. मात्र आता लसीकरणासाठी केंद्रावर नागरिकांची रांग लागत आहे. तिसर्‍या टप्यात सुरू असलेल्या लसीकरणात आभासी पटलावर नोंदणी करणार्‍यांनाच लस दिली जात असल्याने अनेक केंद्रावर लस प्रतीक्षेत आहे. अशात शहरातील चार केंद्र बंद झाल्याने नागरिकांना लसीकरणासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 
 
या संदर्भात सहा. आरोग्य जिल्हा अधिकारी प्रभाकर नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने शहरातील चार केंद्र बंद आहेत. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंदी मेघे येथील कृष्ठरोग अनुसंधान केंद्र, रेल्वे रुग्णालय, तसेच पोलिस रुग्णालयातून होणारे लसीकरण तात्पुरत्या स्वरुपात बंद झाले आहे. तर शासनाचे नवीन निर्देश प्राप्त झाल्याने खाजगी रुग्णालयाला लस देणे बंद केले आहे. त्यामुळे सावंगी रुग्णालयासह 3 खासगी केंद्रावरील लसपुरवठा बंद करण्यात आला आहे. सध्या कोविशिल्डचा तीन दिवस पुरेल एवढा लससाठा उपलब्ध असून जवळपास प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला 200 ते 300 लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. केवळ कोव्हॅक्सिन संपल्याने ते तात्पुरत्या स्वरुपात बंद झाले असून साठा उपलब्ध होताच लसीकरण पुर्ववत करण्यात येईल असे नाईक म्हणाले.