गोवंश चोरी करणारी टोळी जेरबंद

    दिनांक :03-May-2021
|
- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- तब्बल सहा गुन्हे उघड

अमरावती, 
गोवंशाची तस्करी करणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश करून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी तब्बल सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. अमरावती ग्रामीण जिल्ह्यात शेतकर्‍यांचे गोवंश चोरी जाण्याच्या वाढत्या घटना पाहता पोलिस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांनी हालचाली सुरू केल्या.
 
ghgjy_1  H x W:
 
 
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पथकाला गुप्त बातमीदाराकडून एक गोपनीय माहिती मिळाली. करजगाव येथील मोहम्मद सलमान शेख बशीर याने त्याच्या साथीदारांसोबत वेगवेगळी चारचाकी वाहने वापरून जिल्हाभरात वेगवेगळया ठिकाणी जनावर चोरी केल्याची ही माहिती होती. त्यावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शिताफीने करजगाव येथे सापळा रचून मोहम्मद सलमान शेख बशीर याला ताब्यात घेतले.
 
 
अधिक विचारपुस केली असता त्याने त्याचा परतवाडा येथील साथीदार मोहम्मद रिझवान मोहम्मद इरफान आणि अन्य दोन साथीदांसोबत गोवंश चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. अन्य दोन साथीदार अद्याप फरार आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपीकडून गोवंश चोरीचे खल्लार, खोलापूर, पथ्रोट, परतवाडा व आसेगाव पूर्णा या पोलिस ठाणे हद्दीतील सहा गोवंश चोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. या गुन्ह्यांसाठी आरोपींनी जी दोन वाहने वापरली, पोलिसांनी तीसुद्धा जप्त केली आहेत. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक हरि बालाजी एन, अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक आशिष चौधरी, सहाय्यक उपनिरीक्षक संतोष मुंदाने, पोलिस कर्मचारी रवींद्र बावणे, पुरूषोत्तम यादव, दिनेश कनोजिया, पंकज फाटे, राहुल कठाणे सायबर सेलचे सागर धापड, सरिता चौधरी, रितेश वानखडे यांनी केली आहे.