पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल

    दिनांक :03-May-2021
|
पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. स्थिती स्पष्ट झाली आहे. 29 एप्रिल रोजी विविध दूरचित्रवाहिन्यांनी केलेल्या जनमत चाचण्यांमधून जे निष्कर्ष समोर आले होते, ते शंभर टक्के नसले, तरी खरे ठरले आहेत आणि त्यानुसारच पाच राज्यांमध्ये विविध पक्षांची सरकारं स्थापन होणार आहेत. विधानसभेच्या निवडणुका जरी पाच राज्यांमध्ये झाल्या असल्या, तरी सर्वाधिक चर्चा झाली ती पश्चिम बंगालच्याच निवडणुकीची. कारण, केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीने आपली संपूर्ण ताकद याच राज्यात पणाला लावली होती. शिवाय, राज्यातील सत्ताधारी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनेही ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. कधीकाळी या राज्यात सत्तेत राहिलेल्या काँग्रेसची तर चर्चाच नव्हती.
 
 
5 elc_1  H x W:
 
काँग्रेसकडून राहुल, प्रियांका वा सोनिया गांधी यांच्यापैकी कुणीही प्रचारासाठी फिरकलेसुद्धा नाहीत. 30-35 वर्षे सत्ता गाजवणारे डावेही कुठे चर्चेत दिसले नाहीत. त्यामुळे विधानसभेची यंदाची निवडणूक भाजपा आणि तृणमूल यांच्यातच लढली गेली आणि निकालानंतर हे वास्तवही समोर आले आहे. काँग्रेस आणि डावे साफ झाले असले तरी भाजपाने आनंदित होण्याची गरज नाही. कारण, भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी केलेली व्यूहरचना अपयशी ठरल्याचेही सिद्ध झाले आहे. तृणमूलच्या नेत्या ममता विरुद्ध पंतप्रधानांसह भाजपाचे अनेक दिग्गज नेते असा जो सामना झाला, त्यात ममतांचा तृणमूल काँग्रेस पक्ष मोठ्या फरकाने जिंकला, हे वास्तव आहे. ममता बॅनर्जी यांनी एकटीच्या बळावर ही निवडणूक लढवली आणि त्यांनी आपल्या पक्षाला विजय मिळवून दिला. मात्र, बंगालचा गड राखण्यात यशस्वी ठरलेल्या ममतांना नंदीग्राम येथे प्रतिस्पर्धी भाजपाचे शुभेंदू अधिकारी यांनी पराभवाचा दणका देत चांगलाच हादरा दिला. तृणमूलच्या विजयाचे सत्य पचवत भाजपाने आता आत्मचिंतन करण्याची आणि पराभवाची कारणे शोधून पुढील काळात व्यूहरचनेत बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. बंगालमधील मुस्लिम मतदार भाजपाला मतदान करणार नव्हताच आणि ते खरेही ठरले आहे. पण, मुस्लिम मतांमध्ये विभाजन होईल,
 
 
 
हिंदू मतांचे ध्रुवीकरण आपल्या बाजूने होईल, त्या आधारावर आपण बहुमत मिळवू, असा जो पक्षाचा होरा होता, तो चूक ठरला आहे. कारण, मुस्लिम मतांचे विभाजन भाजपाच्या अपेक्षेनुसार झालेच नाही. पीरजादा अब्बास सिद्दिकी यांनी इंडियन सेक्युलर फ्रंट या नावाने पक्ष स्थापन केला होता आणि काँग्रेसशी युती केली होती. ही युती आणि डावे पक्ष मुस्लिमांची मते मिळवतील आणि त्याचा फटका ममता बॅनर्जी यांना बसेल, हा भाजपाचा आणि राजकीय जाणकारांचा अंदाजही खोटा ठरला आहे. बंगालमधील मुस्लिमांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला भरभरून मते दिलीच; हिंदूंनीही मोठ्या प्रमाणात मते दिली आहेत. बंगालमधील हिंदू आधी स्वत:ला बंगाली मानतात, बंगाली अस्मितेला महत्त्व देतात आणि नंतर ते स्वत:ला हिंदू मानतात, ही बाबही लक्षात घ्यावी लागेल. मतांच्या ध्रुवीकरणाबाबत बांधण्यात आलेले सगळे अंदाज चुकले. परिणाम आपल्या सगळ्यांपुढे आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सलग तिसर्‍यांदा बंगालमध्ये सत्ता मिळाली आहे.
 
 
2016 च्या निवडणुकीत भाजपाला तीनच जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत यावेळी पंचेवीस पट जागा जास्त मिळवून पक्षाने आपली ताकद प्रचंड वाढवली आहे, असे सांगत भाजपातील काही मंडळी अपयशावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतीलही. पण, पक्षाच्या धोरणकर्त्यांना असे समर्थन करता येणार नाही. कारण, बंगाल सर करण्याच्या उद्देशानेच पक्षश्रेष्ठींनी वर्ष-दीडवर्ष आधीच निवडणुकीची तयारी सुरू केली होती. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याच्या आधी आणि नंतरही पंतप्रधान मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक दिग्गजांनी बंगालचा दौरा करून वातावरण ढवळून काढले होते. भाजपाची तयारी पाहून ममता बॅनर्जी यासुद्धा धास्तावल्या होत्या. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यांच्या वागण्या-बोलण्यातूनही ही बाब स्पष्टपणे जाणवत होती. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना ही निवडणूक जड जाईल, हे चित्र दिसायला लागले होते. पण, आता प्रत्यक्ष निकालांनंतर चित्र सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट झाले आहे.
 
 
जनतेने ममतांच्या पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. आता भाजपाने पराभवाची चिकित्सा करण्याची गरज निर्माण झाली आहे. भाजपाच्या पराभवाला मतांचे ध्रुवीकरण न होणे हे जसे एक प्रमुख आणि मोठे कारण आहे, तशी अन्य अनेक कारणंही आहेत. पश्चिम बंगालमधील विविध जिल्ह्यांतील भाजपा कार्यालयांसमोर असंख्य कार्यकर्त्यांनी मोर्चे आणि आंदोलने केली होती. भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांवर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेले अशोक लाहिरी यांना अलीपूरद्वारातून तिकीट देण्यात आले होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्षांनी म्हटलं होतं की, लाहिरींबद्दल कधीही ऐकलं नाही, शिवाय त्यांच्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही. अशा अनेक उमेदवारांबद्दल भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. पण, त्याकडे पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केल्याने त्याचा फटका पक्षाला बसला आहे, हे निश्चित! 10 मार्च रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम याठिकाणी हल्ला झाल्याचा आरोप तृणमूलकडून करण्यात आला होता. त्यावेळी तृणमूलनं म्हटलं होतं की, पक्षप्रमुखांवरील हा हल्ला सुनियोजित कटाचा एक भाग आहे. ही घटना नंदीग्रामच्या बिरुलिया बाजारात घडल्याचा दावा करण्यात आला होता, त्यात ममता बॅनर्जींच्या एका पायाला दुखापत झाली होती. यानंतर भाजपा आणि तृणमूलमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. दुखापतीनंतर ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवर बसूनच प्रचार केला, त्याचाही फायदा बॅनर्जी यांच्या पक्षाला झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला नसून, हा त्यांचा कांगावा आहे, हे सिद्ध करण्यात भाजपालाही अपयश आल्याने मतदारांची सहानुभूती ममतांना, ओघानेच त्यांच्या पक्षाला मिळाली, हेही सिद्ध झाले आहे.
 
 
मुख्य म्हणजे बंगालमध्ये यश मिळाले तर मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाचा चेहरा कोण, हे शेवटपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. याउलट, तृणमूल काँग्रेसला यश मिळाल्यास ममता बॅनर्जी याच मुख्यमंत्री होतील, हे स्पष्ट होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलमधून बाहेर पडलेल्या अनेकांना भाजपाने पक्षात घेतले आणि त्यांना उमेदवारीही दिली. शुभेंदू अधिकारी यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला भाजपाने नंदीग्राममधून उभे केले होते. ते ममतांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. पण, त्यांनी मंत्रिपद सोडून भाजपात प्रवेश केल्याने ममतांचा त्यांच्यावर राग होताच. ममतांनीही आपला परंपरागत भवानीपूर हा मतदारसंघ सोडून नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरत अधिकारी यांच्यापुढे आव्हान उभे केले होते. मात्र इथे ममतांना वैयक्तिक पराभवाचा धक्का सहन करावा लागला. बंगालचा गड राखणार्‍या ममता बॅनर्जी पराभूत होणे, हा तृणमूलला मोठा धक्का आहे.
 
 
आसाममध्ये भाजपाने दणदणीत यश मिळवत सत्ता कायम राखली आहे. गेल्या पाच वर्षांत आसामात भाजपाने जे काम केले, त्यामुळेच भाजपाला पुन्हा सत्ता मिळणार, याची खात्री होती. नागरिकत्व कायद्याच्या संदर्भात काँग्रेसने मोठ्या प्रमाणात अपप्रचार करून आसामातील वातावरण गढूळ करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला आणि मतदारांच्या मनात भाजपाच्या हेतूबद्दल शंका नव्हती, हेही आता सिद्ध झाले आहे. तामिळनाडूत यावेळी एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची अनुपस्थिती होती. ती जाणवतही होती. अण्णाद्रमुकजवळ प्रभाव पाडू शकणारा नेताही नव्हता. त्यामुळे करुणानिधीपुत्र एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वात लढणार्‍या द्रमुकला यश मिळेल, असा जो अंदाज होता तो खराही ठरला. तामिळनाडूला लागून असलेल्या पुदुचेरीत राष्ट्रपती राजवट लागली होती. तिथे या राजवटीतच विधानसभेची निवडणूक झाली. यावेळी भाजपा-अद्रमुक यांनी एनआर काँग्रेससोबत युती करून निवडणूक लढली आणि एनआरप्रणित रालोआला याठिकाणी सत्ताही मिळाली आहे. केरळात पुन्हा डाव्या आघाडीला सत्ता मिळाली आहे. डाव्यांनी यंदा 40 वर्षांची परंपरा खंडित केली आहे. पाच-पाच वर्षे डावे आणि काँग्रेस असा जो सत्ताबदल व्हायचा तो यंदा झालेला नाही आणि कमजोर झालेली काँग्रेसच याला कारणीभूत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. शेवटी आसाममधील विजयासाठी भाजपाचे तर बंगालमधील विजयासाठी ममतांचे अभिनंदन करायलाच हवे!