सिएसटीपीएसच्या ‘कन्व्हेअर बेल्ट’ला आग

    दिनांक :03-May-2021
|
- संच क्रमांक 8 व 9 मधील घटना
- आगीच्या कारणांच्या तपासासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती
चंद्रपूर, 
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या संच क्रमांक 8 आणि 9 दरम्यान कोळसा वाहून नेणार्‍या ‘कन्व्हेअर बेल्ट’ला रविवार, 2 मे रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास आग लागली. मात्र, तेथील कर्मचार्‍यांनी प्रसंगावधानाने उर्वरित ‘बेल्ट’ कापले गेले आणि त्यामुळे आग पसरली नाही. अन्यथा, आगीने अवघा परिसर आपल्या कवेत घेतला असता. ही आग अर्ध्या-पाऊण तासात आटोक्यात आली.
 
ffffff_1  H x W
 
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांना याबाबत विचारले असता, ही आग साधारणत: पाऊण तासात आटोक्यात आली असून, दोन्ही संच सुरळीत सुरू आहेत. विजनिर्मितीत काहीही अडथळा आलेला नाही, असे त्यांनी तभाला सांगितले. तसेच या आगीमुळे कोणतीही जीवितहाणी झालेली नसून, वीज निर्मिती करणार्‍या संचाच्या उपलब्धतेवरही कोणताही परिणाम झाला नसल्याचे सीटीपीएस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, ही आग कशी लागली याचा तपास करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत पापडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता (प्रशासन) यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आपली कामगिरी व कार्यक्षमता सातत्याने उत्कृष्ट ठेवण्यासाठी सतत कार्यरत असताना सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष दिले जात असल्याचे सांगितले आहे. सर्व उपाययोजना असून देखील ‘कन्व्हेअर बेल्ट’ला आग लागल्याची घटना घडली. मात्र, सुदैवाने लवकरच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून, शशिकांत पापडे यांना चौकशीसाठी नियुक्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.