रोहणीतून व्हॉईट कॉलरकडून अवैध रेती उपसा

    दिनांक :03-May-2021
|
वर्धा, 
जिल्ह्यातील 29 रेती घाटांपैकी 9 रेती घाट शासकीय इमारत बांधकामासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. कोरोना काळात शासकीय बांधकाम बंद असतानाही राखीख रेती घाटावरून अवैध रेती उत्खनन सुरूच आहे. त्याही पुढे जात देवळी तालुक्यातील रोहणी येथील नदीतून रेतीची 24 तास चोरी सुरू असून व्हाईट कॉलरांनी रोहणी परिसर ताब्यात घेतला आहे.
 
jjjj_1  H x W:
 
जिल्ह्यात लहान मोठे असे 37 रेतीघाट आहे. त्यापैकी 29 रेतीघाटांना पर्यावरण समितीने परवानगी दिल्याने लिलावास पात्र ठरले. त्यात घरकुलसाठी 5 तर शासकीय कामासाठी 4 असे 9 राखीव ठेवल्याने प्रत्यक्ष लिलावाकरिता 20 रेतीघाट काढले होते. रेतीघाटाची किंमत जास्त असल्याने फेरलिलाव करुनही केवळ पाचच रेतीघाटाचा लिलाव झाला. देवळी तालुक्यात प्रस्थापित राजकीय वर्चस्वाने रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या राजकीय हस्तक्षेपामुळे रेती तस्करांची चांगलीच चलती आहे. कोणत्याही प्रशासकीय अधिकारी, पोलिस प्रशासनाला न जुमानता शासकीय नियमांचे उल्लंघन करून रेतीची चोरी सुरू आहे. विद्यमान परिस्थितीत रोहणी हा शासकीय रेती घाट नसतानाही त्या ठिकाणाहून रेतीची चोरी होत आहे. गेल्या काही महिन्यात देवळी तालुक्यातील काही नेते आणि सामाजिक संघटनांनी यात चांगले हात धुतले.
 
 
या अवैध रेतीची वाहतूक करण्यासाठी या कंपनीकडे जवळपास 50 टिप्पर आहेत. विकत घेतलेल्या घाटातून नियमांनुसार रॉयल्टीनुसार 200 ते 250 ब्रास रेतीचा उपसा होणे अपेक्षित आहे. मात्र, नियमांना खिशात ठेवत 10 व 12 चक्का टिप्परच्या माध्यमातून दिवसाला 100 ते 200 वाहनं रेती बोटींच्या माध्यमातून उपसा दिवसरात्र सुरू आहे. या अवैध रेतीची साठवणूक करून ठेवण्यात आली आहे. विजयगोपाल येथे 1 हजार पेक्षा अधिक गाड्यांचा रेतीसाठा करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी 6 हजार रुपये भावाने रेतीची विक्री होत असताना आता ती 8 हजार रुपये भावाने विकल्या जात असल्याचे विश्‍वसनिय सूत्रांनी सांगितले. रेती घाटाचा लिलाव होण्यापूर्वी घर बांधणार्‍यांना अवैध रेती विकत घ्यावी लागत होती. आता लिलाव झाले असले तरी नदीतून शासनाच्या परवानगीपेक्षा जास्त रेतीचे उत्खनन होत असल्याने तिही रेती आता चोरीचीच म्हणावी लागणार आहे. रोहणी घाट नसतानाही त्या ठिकाणाहून रेतीची चोरी होत असताना जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा करवाही करण्यासाठी का धजावत नाही असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.