सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर मात करू

    दिनांक :03-May-2021
|
- पालकमंत्री शंभूराज देसाई
वाशीम, 
जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केल्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी झाले असून, गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. कोरोना बाधितांवर काळजीपूर्वक उपचार करण्यात येत आहे. ज्या बाधित रुग्णांना रेमडेसिवीर आणि प्राणवायू आवश्यकता आहे, त्यांना ते मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निधीची कमतरता नाही. सर्वांच्या सहकार्यातून आपण कोरोनावर मात करू, असा विश्‍वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. कोविड-19 उपाययोजांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिप प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार किरणराव सरनाईक, अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
was _1  H x W:
 
पालकमंत्री देसाई म्हणाले, रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्ह्यात नियमितपणे मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहे. इंजेक्शनचा अधिकचा कोटा जिल्ह्याला उपलब्ध व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसात बाधितांची संख्या कमी झाली असली तरी आगामी 15 दिवसात बाधितांचे प्रमाण आणखी कमी करावयाचे आहे. संपर्क कमीत कमी आला की ते शक्य होईल. पोलिसांनी संचारबंदी अंमलबजावणीची आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. तेव्हाच आपण दुसर्‍याला लाटेतून बाहेर पडू शकतो. संभाव्य कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता तिचा सामना करण्यासाठी आरोग्य सुविधा बळकट करण्यात येत असल्याचे देसाई यांनी सांगितले.
 
कोविड-19 च्या उपाययोजनांबाबत माहिती देतांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर म्हणाले, जिल्ह्यात कोविड केअर सेंटर मध्ये 890 खाटांची व्यवस्था आहे. 626 खाटांना प्राणवायूची व्यवस्था, 51 खटांना एनआयव्ही व 32 खाटांना बायपॅप मशीनची सुविधा आहे. वाशिम व कारंजा येथे अनुक्रमे 75 व 50 प्राणवायू खाटा वाढविण्याचे नियोजन आहे. केंद्र शासनाच्या निधीतून जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय येथे हवेतून प्राणवायू निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. वाशीम येथे दोन आणि कारंजा येथे एक प्राणवायू निर्मिती प्रकल्प 15 मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. वाशीम, मंगरूळनाथ, रिसोड व मालेगाव येथे प्रत्येकी एक प्राणवायू निर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे, असे डॉ. आहेर यांनी सांगितले.