मनपाला मिळणार 10 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर

    दिनांक :03-May-2021
|
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मदत
- प्राप्त व्हेन्टीलेटर्सचे झाले वितरण
अमरावती,
कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रथम अमरावती मनपाला 10 व्हेन्टीलेटर्स दिले. आता लवकरच 10 ऑक्सिजन कॉन्सट्रेटरही मिळणार आहे. महापौर चेतन गावंडे यांच्या विनंतीला मान देत नितीन गडकरी यांनी ही मदत केली आहे. सोमवारी आयोजित कार्यक्रमात महापौरांना मिळालेले 10 व्हेन्टीलेटर्स मनपा आयुक्तांच्या स्वाधीन करण्यात आले.
 
fh_1  H x W: 0
 
 
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बांधितांसह मृत्यू संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची लाट थोपविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑक्सिजन, रेमडेसिविर, व्हेन्टीलेटर्स, रुग्णवाहिका आणि आवश्यक त्या सामग्रीचा पुरवठा सुरु केला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीला देखील ठोस मदत द्यावी, अशी विनंती महापौर चेतन गावंडे व सभागृह नेता तुषार भारतीय यांनी त्यांच्याकडे केली होती. ती मान्य करीत पहिल्या टप्प्यात भरीव मदतीचा हात दिला. मनपाच्या सभागृहात सोमवारी महापौर चेतन गावंडे यांनी आठ नॉन व्हेन्टीलेटर्स मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे सुपूर्द केले. हेडगेवार हॉस्पिटलला दोन व्हेन्टीलेटर्स यावेळी देण्यात आले.
 
 
दरम्यान, हा उपक्रम सुरु असताना नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावरून 10 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मनपाला त्वरित देण्यात येत असल्याचा संदेश आपल्याला आला आहे, अशी माहिती भारतीय यांनी यावेळी दिली. महापौर गावंडे यांनी नितीन गडकरी यांचे यावेळी आभार मानले. महानगरपालिकेला सहकार्य करावे असे पत्र दिल्याबरोबर दुसर्‍याच दिवशी त्यांनी भरीव मदत केली. ऑक्सिजन प्लांटसाठीही त्यांनी होकार दिलेला असून तो कार्यान्वित होणार आहे, असे महापौरांनी यावेळी सांगितले.
 
 
उपमहापौर कुसुम साहु, स्थायी समिती सभापती सचिन रासने, नगरसेवक संजय नरवणे, सुनील काळे, राजेश साहु, श्रीचंद तेजवाणी, उपआयुक्त सुरेश पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, डॉ. जयश्री नांदुरकर, हेडगेवार हॉस्पिटलचे अजय श्रॉफ, महेश जोग, डॉ. बोधनकर, डॉ. राठोड यावेळी उपस्थित होते.