तिन्ही तालुक्यांसाठी ऑक्सिजन रुग्णवाहिका

    दिनांक :03-May-2021
|
- आमदार प्रताप अडसड यांचा निर्णय
धामनगाव रेल्वे, 
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात येणार्‍या धामणगाव, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यासाठी आमदार विकास निधीतून तीन ऑक्सिजन रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय आ. प्रताप अडसड यांनी घेतला आहे. तालुक्यातल्या रुग्णाला तातडीने जिल्हास्थानावर नेण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे.
 
fhfgb _1  H x W
 
अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. धामणगाव मतदार संघातही कोरोना रुग्णांची संख्या बरीच आहे. कोरोना रुग्णांना चांगली सुविधा मिळावी यासाठी आ. अडसड यांनी नुकताच चांदूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा दौरा केला. यावेळी स्वतः जिल्हाधिकारी शैलेश नवाल व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या, त्यात ऑक्सिजनचा न होणारा पुरवठा अशा परिस्थितीत रुग्णवाहिका न मिळाल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. सर्व स्थितीचा अंदाज घेऊन तिन्ही तालुक्यासाठी आमदार निधीतून रुग्णवाहिका घेणार असल्याचे आ. अडसड यांनी सांगितले. उपरोक्त तिनही तालुक्यात कोविड रुग्णालय, ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. जिल्हा प्रशासन याविषयी तातडीने अधिक पावले उचलत आहे.