शाळांत विलगीकरण तयार करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखा

    दिनांक :03-May-2021
|
- आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,  
ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रूग्णांचे विलगीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, त्याचप्रमाणे घरांमधील अपुर्‍या खोल्या व अव्यवस्था यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यांना कोरोनाची लागण होवू नये यादृष्टीने प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्येक पंचायत समिती स्तरावर उत्तम स्थितीतील जिल्हा परिषद शाळेत सर्व सोयी सुविधा युक्त विलगीकरण केंद्र तयार करावे, अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांना पत्रे पाठवित त्यांच्याशी चर्चा देखील केली. सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने कळस गाठला आहे. दिवसागणीक कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूदरसुद्धा वेगाने वाढत आहे.
 

mongantiwar_1   
 
आधी नागरी भागात प्रादुर्भाव जास्त होता. आता तो तालुका स्तरावरून ग्रामीण भागात पोहचला आहे. ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आपण बघत आहोत. ग्रामीण भागात एखाद्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधीत झाली. तर आर्थिक अडचणींमुळे त्या व्यक्तीला घरातच विलगीकरणात केले जाते. त्या घरात एकच स्वच्छतागृह, अपुर्‍या खोल्या यामुळे घरातील अन्य सदस्यांना कोरोनाची लागण होताना आपण बघतो. यामुळे रूग्णसंख्येत मोठया प्रमाणावर वाढ होत आहे. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्येक पंचायत समिती स्तरावर उत्तम स्थितीतील जिल्हा परिषद शाळा निवडुन त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधांनी युक्त विलगीकरण केंद्र तयार करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
 
या विलगीकरण केंद्रासाठी कंत्राटी पध्दतीने दोन कर्मचारी नेमून त्यांच्या माध्यमातून हे केंद्र संचालीत करता येवू शकते. यासंदर्भात आताच अनुमती दिल्यास किमान एक महिन्याच्या कालावधीत हे विलगीकरण केंद्र तयार होईल. यादृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. या साठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 15 टक्के निधी राखीव ठेवण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.