विदर्भात पावसाची स्थिती कायम

    दिनांक :03-May-2021
|
- अनेक ठिकाणी गारपीटीची शक्यता
पुणे,
राज्यात अनेक शहरांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. गारपीटीमुळे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. राज्यातील शेतकरी एकीकडे कोरोना विषाणूशी झगडत असताना अस्मानी संकटाने त्यांना दुहेरी आघात केला आहे. आजही राज्यासह विदर्भातही पावसाची स्थिती कायम असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज सायंकाळी नागपूरसह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
 
 
cdfgd_1  H x W:
वादळासह विजांच्या कडकडाट
जळगाव, धुळे, पुणे, अहमदनगर, नाशिक नंदुरबार, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. याठिकाणी तुफान वादळासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसानं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी विजा पडल्यानं विविध ठिकाणी किमान 11 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तर एकट्या मराठवाड्यात एकूण पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे पुण्याजवळील भोर याठिकाणी वीज पडून दोन चिमूरड्या मुलींचा जीव गेला आहे. त्यामुळे या अस्मानी संकटात काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.